घटसर्प आजारामुळे १० गावांतील जनावरांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:19 PM2018-07-22T15:19:45+5:302018-07-22T15:20:55+5:30
इंझोरी: जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनावरांवर विविध आजारांचा प्रादूर्भाव होत असतानाच इंझोरी परिसरात गुरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी: जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनावरांवर विविध आजारांचा प्रादूर्भाव होत असतानाच इंझोरी परिसरात गुरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे १० गावांतील गुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच या परिसरात २ वर्षांपासून पशूसंवर्धन विभागाकडून कुठल्याच प्रकारचे लसीकरण करण्यात आले नाही आणि पशूवैद्यकीय अधिकारीही फिरकले नाहीत.
पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर पाणी दुषित होणे, चाऱ्यांवर किडीचा प्रादूर्भाव होणे असे प्रकार घडतात. याचा परिणाम गुरांवर होतो दुषित पाणी आणि किड लागलेला चारा खाण्यात गेल्याने विविध आजारांची लागण होते. इंझोरी परिसरात आता सततच्या पावसामुळे गुरांवर विविध आजारांची लागण होत असून, त्यात घटसर्प या भयंकर आजाराचा समावेश आहे. या आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच असल्याने या परिसरातील १० गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत पशू संवर्धन विभागाकडून लसीकरण मोहिम राबविण्यासह गुरांची नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असत; परंतु पशू संवर्धन विभागाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. इंझोरी, चौसाळा, धानोरा, भोयणी, नायणी, खापरी, खंडाळा, दापुरा बु., दापुरा खुर्द, अजनी, जामदरा, तोरणाळा, उंबर्डा, म्हसणी आदि १४ गावांतील गुरांचा जीव यामुळे धोक्यात आला आहे. काही गुरे आजार बळावल्यामुळे दगावण्याच्या स्थितीत आली आहेत. त्यातच पशू संवर्धन विभागाकडून दखल न घेण्यात आल्याने पशूपालकांत संतापाची लाट उसळली आहे.
दापुऱ्यातील पशू दवाखान्याचे स्थलांतर कोंडोलीत
पूर्वी मानोरा तालुक्यातील इंझोरी आणि दापुरा परिसरातील हजारो पशूंच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी दापुरा येथे पशूवैद्यकीय दवाखाना सुरु करण्यात आला होता; परंतू गेल्या ९ वर्षांपासून हा दवाखाना बंद करण्यात आला असून, या परिसराचा प्रभार मानोरा तालुक्यातील कोंडोली येथे स्थलांतरीत करण्यात आला आहे. आता परिसरातील गावांसाठी हे अंत २५ किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी गुरे नेणेच अशक्य होत असून, पशू संवर्धन विभाग मात्र इंझोरी परिसरात फिरकत नाही. त्यामुळे ३० हजारांहून अधिक गुरांचा जीव धोक्यात आला आहे.