मुंगळा परिसरात झालेल्या अवकाळी पावसाचा तूर पिकाला फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:49 PM2017-11-27T18:49:56+5:302017-11-27T18:54:16+5:30
मुंगळा परिसरात शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी वादळवा-यासह झालेल्या पावसामुळे तूर पिकाला जबर फटका बसला आहे. तुरीच्या शेंगा व फुलांची नासाडी झाली असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंगळा (वाशिम) - मुंगळा परिसरात शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी वादळवा-यासह झालेल्या पावसामुळे तूर पिकाला जबर फटका बसला आहे. तुरीच्या शेंगा व फुलांची नासाडी झाली असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
यावर्षी शेतक-यांना नानाविध संकटातून जावे लागत आहे. खरिप हंगामात अल्प पाऊस झाल्याने तसेच पावसात सातत्य नसल्याने मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. त्यानंतर या शेतमालाला समाधानकारक बाजारभावही मिळाले नाहीत. खरिप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामावर लक्ष केंद्रीत करीत आहेत. मात्र, प्रकल्पातील अल्प जलसाठा, महावितरणची वीजजोडणी खंडित मोहिम यामुळे रब्बी हंगामातही अडथळे निर्माण होत आहेत. अशातच मुंगळा परिसरात दोन दिवसांपूर्वी वादळवा-यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे तुरीची फुले व लहान शेंगा गळून खाली पडल्या तसेच काही ठिकाणी तूरीची झाडेही वाकली. धुके पडत असल्याने तुरीची फुले व कोवळ्या शेंगांना हाणी पोहोचत असल्याचा दावा शेतक-यांनी केला आहे. काही शेतक-यांच्या तूरीला तर फुलेच राहिली नसल्याचे दिसून येते. तूरीला जबर फटका बसत असल्याने शेतक-यांची चिंता अधिकच वाढत आहे. मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनातील घट आणि कमी बाजारभाव यामुळे अगोदरच शेतकरी मेटाकुटीस आला आहे. आता तूरीच्या पिकालाही जबर फटका बसल्याने मूंगळा परिसरातील शेतकºयांची झोप उडाली आहे. महसूल व कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे करावे आणि नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनदरबारी पाठवावा, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली आहे.