दुष्काळाच्या झळा: भर जहॉगिर परिसरातील तलाव कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 05:55 PM2019-01-18T17:55:52+5:302019-01-18T17:56:24+5:30
भर जहॉगिर (वाशिम) : रिसोड तालुक्यातील भर जहॉगिर परिसरात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. उन्हाळ्याला अद्याप पाच महिने वेळ असताना परिसरातील तलाव कोरडे ठण झाले आहेत.
- अशोक चोपडे
लोकमत न्यूज नेटवर्क
भर जहॉगिर (वाशिम) : रिसोड तालुक्यातील भर जहॉगिर परिसरात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. उन्हाळ्याला अद्याप पाच महिने वेळ असताना परिसरातील तलाव कोरडे ठण झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, जनावरांच चारा, पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
रिसोड तालुक्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे शेती उत्पादन घटले आणि पाण्याची पातळी खोल गेल्याने तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळेच शासनाने या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. तथापि, तालुक्यातील काही मंडळातील परिस्थिती त्यापेक्षाही गंभीर असून, अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, रब्बी पिकेही संकटात सापडली आहेत, तसेच जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यात भर जहॉगिर परिसराचा समावेश आहे. परिसरातील सोनारी पाझर तलाव, मोरगव्हाण लघू सिंचन तलाव, भर जहॉगिर येथील आसरा माता तलावात सद्यस्थितीत पाण्याचा थेंबही नसून, मांगवाडी, गणेशपूर, शेलुखडसे, कंकरवाडी, मांडवा, चाकोली, मोप, आसोला, मोहजा बंदी आदि ठिकाणचे तलाव, प्रकल्प, हिवाळ्यातच कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकºयांची गहू, हळद, हरभरा आदि पिके संकटात सापडली आहेत.
विहिरी, कूपनलिकांची पातळी खोल
रिसोड तालुक्यात आधीच पाऊस कमी झाला असताना भर जहॉगिर परिसरात पावसाचे प्रमाण त्याहून अल्प आहे. त्यामुळेच परिसरातील जलप्रकल्पांनी हिवाळ्यात तळ गाठला असून, गावागावातील विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही प्रचंड खालावली आहे. ऐन हिवाळ्यातच ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. याची दखल शासन, प्रशासनाने घेऊन या ठिकाणी तीव्र दुष्काळ जाहीर करावा आणि ग्रामस्थ, शेतकरी व जनावरांसाठी दुष्काळी सुविधांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.