जोरदार पावसामुळे शेतजमीन खरडली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 04:02 PM2019-07-07T16:02:24+5:302019-07-07T16:02:35+5:30
शिरपूर जैन: परिसरातील दुधाळा, किन्ही घोडमोड, वाघी बु., खंडाळा आदी गावात २ जुलै रोजी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: परिसरातील दुधाळा, किन्ही घोडमोड, वाघी बु., खंडाळा आदी गावात २ जुलै रोजी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली आहे. खरीपातील पेरणीनंतर आलेल्या जोरदार पावसामुळे जमीन खरडल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
शिरपूरसह परिसरातल्या दुधाळा, किन्हीराजा, वाघी बुद्रूक, खंडाळा यासह अन्य गावातील बहुतांश बळीराजांनी अल्पशा पावसाच्या भरवशावर खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण केल्या. त्यानंतर शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत होते. अशातच २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यातच मालेगाव ते सेनगाव महामार्गावर अनेक ठिकाणी नाल्यांवर पुलाचे काम सुरु आहे. कंत्रटदाराने पुरेसी काळजी न घेतल्याने नाल्याच्या ठिकाणी पाणी अडले. यामुळे पुराचे पाणी किन्ही घोडमोड, दुधाळा येथील शेतकरी भगवान पुंडगे, श्रीराम बळी, महादेव गायकवाड, प्रभाकर गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, विठ्ठल कव्हर, शिवाजी काळे आदींसह अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी साचल्याने पेरलेली बियाणे वाया गेले आहे. तसेच ज्या लोकांच्या पेरण्या सुरू होत्या त्या पेरणीवर जोरदार पाऊस झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकºयांवर ओढवले आहे. गावातील नदीचे पाणी हे पात्र सोडून अनेकांच्या शेतामध्ये घुसले व शेतातील माती खरडून वाहून नेली.