अपूर्ण विहिरींमुळे नवीन विहिरींची कामे वांध्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 02:10 PM2019-03-13T14:10:56+5:302019-03-13T14:11:07+5:30
वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींच्या प्रलंबित कामांच्या संख्येवरून, नवीन विहिरींची मंजूरी अवंलबून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींच्या प्रलंबित कामांच्या संख्येवरून, नवीन विहिरींची मंजूरी अवंलबून आहे. पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास, त्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन विहिरींना मान्यता मिळत नसल्याचा फटका जिल्ह्यातील नवीन विहिरींना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी शासनातर्फे विहिर बांधकामाला प्राधान्य दिले जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीचा लाभ दिला जातो. विहिर बांधकामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात नसल्याने विहिरींची कामे प्रलंबित राहतात. अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी नवीन विहिरींना मान्यता देण्याचे धोरण यापूर्वीच निश्चित केले आहे. जिल्ह्यात आढावा घेतला असता, अनेक ग्रामपंचायतींमध्ये पाचपेक्षा जास्त विहिरींची कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे रोहयोंतर्गत शेतकºयांचे नवीन विहिरीसाठी आलेले अर्ज धूळखात पडत आहेत. प्रगतीपथावर असलेल्या विहिरींची कामे लक्षात घेऊनच नवीन विहिरींना मंजूरी मिळणार आहे. एका ग्राम पंचायतीत एका वेळेस पाच विहिरींची कामे प्रगतीपथावर राहतील, याची दक्षता ग्रामपंचायती घ्यावी लागत आहे. एका ग्रामपंचायतीत तीन विहिरींचे कामे प्रगतीपथावर असल्यास नव्याने दोन विहिरींची कामे हाती घेण्यात येतील; परंतू पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असतील तर संबंधित ग्रामपंचायतीत नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देऊ नये, असे निर्देश असल्याने नवीन विहिरींसंदर्भातील अर्ज धूळखात आहेत. जिल्हा परिषदेच्या यापूर्वीच्या स्थायी तसेच सर्वसाधारण सभेत नवीन विहिरींबाबत चर्चा झाल्या, प्रश्न उपस्थित झाले होते. परंतू, प्रलंबित विहिरींची कामे पूर्ण न झाल्याने नवीन विहिरींचा प्रश्न निकाली निघू शकला नसल्याचे सांगितले जात आहे.