जैनांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपुरात भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 06:40 PM2017-12-17T18:40:10+5:302017-12-17T18:41:06+5:30
जैनांची काशी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथील संस्थानमध्ये दर्शनासाठी परप्रांतीय भाविकांची मांदियाळी दिसत आहे. श्वेतांबर संस्थानमधील आवश्यक सोयीसुविधांमुळे दिवसाकाळी हजाराच्याव परप्रांतीय भाविक या ठिकाणी दाखल होत असल्याने गावातील विविध व्यवसांयानाही झळाळी आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: जैनांची काशी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथील संस्थानमध्ये दर्शनासाठी परप्रांतीय भाविकांची मांदियाळी दिसत आहे. श्वेतांबर संस्थानमधील आवश्यक सोयीसुविधांमुळे दिवसाकाळी हजाराच्याव परप्रांतीय भाविक या ठिकाणी दाखल होत असल्याने गावातील विविध व्यवसांयानाही झळाळी आली आहे.
शिरपूर जैन येथील जगप्रसिद्ध अंतरीक्ष पार्श्वनाथ मंदिर श्वेतांबर आणि दिगंबर पंथांमधील वादामुळे १९८२ पासून बंद आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी पोलिसांच्या बंदोबस्तातच मूर्ती पुजेसाठी हे मंदीर उघडले जाते. दोन्ही पंथांचे पुजारी दूरवरूनच पुजा करीत असतात, तर इतर भाविक एका खिडकीतून भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथांच्या मुर्तीचे दर्शन घेत असतात. याच कारणामुळे या ठिकाणी येणाºया जैन भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती; परंतु मागील तीन वर्षांत श्वेतांबर संस्थानने स्थानिक पारसबाग संकुलात भव्य असे सात भक्तनिवास उभारले, सुसज्ज भोजनशाळा आणि भक्ती इमारतही उभारली. एकाच दिवशी जवळपास दोन हजारांहून अधिक भाविक या ठिकाणी आरामात राहू शकतात. त्यामुळे गत काही दिवसांपासून येथे पुन्हा भाविकांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. योग्य सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने या ठिकाणी गेल्या वर्षभरात ७५ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. यात परप्रांतीय भाविकांची संख्या मोठी असून, यामुळे गावातील विविध व्यवसायांना झळाळी आली आहे. गावातील लोकांनाही रोजगार उपलब्ध होत आहेत. दूध, फळे, मिनरल वॉटर, पुजेचे साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे.