अचूक बँक खात्याअभावी अतिवृष्टीची रक्कम शासनजमा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:11 PM2020-06-10T17:11:19+5:302020-06-10T17:11:43+5:30
मुदतीत उपरोक्त कार्यवाही झाली नाही तर शिल्लक रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.
वाशिम : अमरावती विभागात आॅक्टोबर-नोव्हेंबर-२०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाईची रक्कम शासनाने विविध टप्प्यात जिल्हास्तरावर मार्चपूर्वी वितरीत केली. बँक खात्यातील चुका व अन्य कारणामुळे अजूनही ८ टक्के शेतकरी यापासून वंचित राहिले. वंचित शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत संबंधित तलाठ्यांकडे आवश्यक ती कागदपत्रे देऊन नुकसानभरपाईचा लाभ घेता येईल. या मुदतीत उपरोक्त कार्यवाही झाली नाही तर शिल्लक रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.
राज्यात आॅक्टोबर-नोव्हेबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जोरदार अवकाळी पाऊस पडून राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांच्या २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवरील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. नुकसानापोटी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांना टप्प्याटप्प्याने निधी मिळाला. आतापर्यंत ९२ टक्के शेतकºयांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत ८ टक्के शेतकºयांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्याने तसेच अचूक बँक क्रमांक, आधार क्रमांक न दिल्याने ही रक्कम शेतकºयांपर्यंत पोहचू शकली नाही. वंचित शेतकºयांना नुकसानभरपाईचा लाभ देण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली असून, १५ जूनपर्यंत या शेतकºयांना आपले बँक खाते क्रमांक व आधारकार्डची छायांकीत प्रत संबंधित तलाठ्यांकडे जमा करावी लागणार आहे. त्याऊपरही कुणी तलाठ्याशी संपर्क साधला नाही तर शिल्लक राहिलेली रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.