मराठवाड्यात आंदोलन; वाशिमतून हिंगोलीकडे जाणाऱ्या बस बंद

By दिनेश पठाडे | Published: February 16, 2024 06:16 PM2024-02-16T18:16:01+5:302024-02-16T18:17:08+5:30

प्रवाशांची गैरसोय; आंदोलनाच्या स्थितीवर प्रशासनाचे लक्ष.

due to agitation in marathwada buses from washim to hingoli closed | मराठवाड्यात आंदोलन; वाशिमतून हिंगोलीकडे जाणाऱ्या बस बंद

मराठवाड्यात आंदोलन; वाशिमतून हिंगोलीकडे जाणाऱ्या बस बंद

दिनेश पठाडे, वाशिम : सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे. शासनाकडून निर्णय होत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको, उपोषण, कडकडीत बंद पुकारला जात आहे. आंदोलनादरम्यान एसटी बसचे नुकसान होण्याची भीती असल्याने महामंडळाने सावध भूमिका घेत, हिंगोलीमार्गे परभणी, नांदेडकडे जाणाऱ्या सर्व बस शुक्रवारी (दि.१६) बंद केल्या होत्या. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १० तारखेपासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या उपोषणाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मराठा समाज बांधवांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील शिरडशहापूर जवळ तरुणांनी बस पेटवून दिली, तसेच दोन बसवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाला मिळतात. सकाळी हिंगोलीपर्यंत सुरू असलेली बससेवादेखील दुपारनंतर बंद करण्यात आली. हिंगोली, परभणी, नांदेड व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील आंदोलनाची स्थिती पाहूनच वेळेवर बस सोडण्याचा निर्णय आगार प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. दरम्यान, परभणी, हिंगोली, नांदेडकडे जाणाऱ्या बस बंद असल्याची चर्चा शुक्रवारी सकाळपासूनच होती. त्यामुळे अनेकांनी रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दिली.

सिंदखेडराजापर्यंतच धावल्या बस

वाशिमवरून मराठवाड्यात जाणाऱ्या बस शुक्रवारी जवळपास बंद करण्यात आल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणेकडे जाणाऱ्या बसदेखील सकाळपासूनच बंद होत्या. या शहराकडे जाणाऱ्या बस वाशिम आगारातून सिंदखेडराजापर्यंतच सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागला.

Web Title: due to agitation in marathwada buses from washim to hingoli closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम