गौण खनिजाच्या वाहतुकीमुळे पाणंद रस्त्या झाला नाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:26+5:302021-07-22T04:25:26+5:30
वाशिमपासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकळी येथील शेतीच्या वहिवाटीसाठी पारंपरिक पाणंद रस्ता आहे. या रस्त्यावर शेकडो शेतकऱ्यांची शेती ...
वाशिमपासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकळी येथील शेतीच्या वहिवाटीसाठी पारंपरिक पाणंद रस्ता आहे. या रस्त्यावर शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे. आधीच या रस्त्याची अवस्था वाईट असताना गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २०६ साठी सुकळी परिसरातील माळरानातून गौण खनिजाची वाहतूक करणारी अवजड वाहने या रस्त्यावरून धावत आहेत. यामुळे रस्त्यावर मोठमोठे नालासदृश चर तयार झाले आहेत. या चरांत पावसाचे पाणी साचून दलदलच झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले असून, या रस्त्यावरून वाहनेही नेता येत नसल्याने आता शेतात पिकांवर फवारणीसह इतर कामांसाठी आवश्यक साहित्याची वाहतूक करणे अशक्य झाल्याने पिके संकटात सापडली आहेत. मार्गावरून वाहने नेण्यासाठी ग्रामस्थांनी विरोधही केला; परंतु ग्रामस्थांना वाहनचालक जुमानतच नाहीत.
-------
तहसीलदारांनी लक्ष देण्याची मागणी
सुकळी येथील पाणंद रस्त्याचे गौण खनिज वाहतुकीमुळे तीन तेरा वाजल्याने शेतकऱ्यांची वाट बंद झाली आहे. त्यामुळे या मार्गाने गौण खनिजाची वाहतूक करण्यास ग्रामस्थ विरोध करीत असतानाही त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष आहे. आता तहसीलदारांनीच याप्रकरणी लक्ष घालून गौण खनिजाची वाहतूक थांबवावी व रस्त्याची तात्पुरती डागडुजी करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.