मेडशी परिसरात दुबार पेरणीचे संकट
By admin | Published: July 9, 2017 02:01 PM2017-07-09T14:01:03+5:302017-07-09T14:01:03+5:30
हलक्या दर्जाच्या जमिनीवरील पिकांनी माना खाली टाकल्याचे दिसून येते.
मेडशी (वाशिम) - गत १२ ते १५ दिवसांपासून दमदार पाऊस नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे.
यावर्षी वेळेवर पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने सुरूवातीला वर्तविला होता. त्यानंतर पाऊस लांबणीवर पडणार असल्याचा अंदाजही वर्तविला. मेडशी परिसरात मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला होता. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र, त्यानंतर पावसात सातत्य नसल्याने काही शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या. दरम्यान, गत १२ ते १५ दिवसांपासून पिकास योग्य असा पाऊस नसल्याने कमी दर्जाच्या जमिनीवरील पिके कोमेजून जात असल्याचे दिसून येते. मेडशी येथील शे. सुलतान शे. सरवर यांच्यासह काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे. तर येत्या एक-दोन दिवसात पाऊस आला नाही तर दुबार पेरणी करण्याची भीती मेडशी परिसरातील अनिस बागवान, विजय पाल, मो. मजहर या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दमदार पाऊस नसल्याने पिके कोमेजून जात आहेत तर हलक्या दर्जाच्या जमिनीवरील पिकांनी माना खाली टाकल्याचे दिसून येते.