‘डीजे’वरून मालेगाव येथे दुर्गा विसर्जन मिरवणूक तीन तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:34 PM2018-10-19T17:34:59+5:302018-10-19T17:35:35+5:30
मिरवणुकीदरम्यान मंडळांनी ‘डीजे’ लावल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला तर दुसºया बाजूने ‘डीजे’चा आग्रह कायम राहिल्याने दुपारी १ ते ४ या दरम्यान मिरवणूक एका जागेवरच ठप्प होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : मालेगाव येथे १९ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजतापासून दुर्गा विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. दरम्यान, मिरवणुकीदरम्यान मंडळांनी ‘डीजे’ लावल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला तर दुसºया बाजूने ‘डीजे’चा आग्रह कायम राहिल्याने दुपारी १ ते ४ या दरम्यान मिरवणूक एका जागेवरच ठप्प होती. नगराध्यक्ष पती अरूण बळी यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने ४.३० वाजता मिरवणूक पूर्ववत झाली.
मालेगाव येथे सकाळी १० वाजतापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला होता. दुपारी १ वाजेदरम्यान काही नवदुर्गा मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’ लावल्याचा प्रकार निदर्शनात आल्याने पोलीस प्रशासनाने मंडळावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. ‘डीजे’चा आवाज कमी करा, नाहीतर डीजे मालक व गाडीवर कायदेशीर कारवाई करू अशी भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली तर दुसरीकडे ‘डीजे’चा आग्रह काही मंडळांकडून कायम राहिल्याने दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान मिरवणूक ठप्प होती. काही मंडळाच्या पदाधिकाºयांनी अन्य सण, उत्सवादरम्यान काही मिरवणुकांमध्ये ‘डीजे’ चालतो का नाही? असा सवाल उपस्थित केला. प्रकरण मिटत नसल्याचे पाहून शेवटी नगराध्यक्ष पती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरुण बळी यांनी यशस्वी मध्यस्थी करीत नवदुर्गा मंडळाच्या पदाधिकाºयांची समजूत काढली. त्यानंतर विसर्जन मिरवणूक पूर्ववत झाली. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.