कोरोना काळात राज्याच्या सीमेपर्यंतच होती जिल्ह्यातील बसफेऱ्यांना मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:14+5:302021-03-15T04:37:14+5:30
‘लॉकडाऊन’च्या काळात वाशिम जिल्ह्यात तेलंगणा, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, तमिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, झारखंड, ...
‘लॉकडाऊन’च्या काळात वाशिम जिल्ह्यात तेलंगणा, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, तमिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, झारखंड, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल, आदी २० राज्यांतील कामगार अडकून पडले होते. या कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी बससेवा उपलब्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने १ एप्रिलपर्यंत वाशिम जिल्ह्यात परराज्यातील अडकलेल्या कामगारांची माहिती संकलित केली होती. या सर्व कामगारांना त्यांच्या संबंधित राज्याच्या सीमेपर्यंतच एसटी बसने सोडण्यात आले.
----------
एकाही चालकाला संसर्ग झाला नाही
जिल्ह्यात अडकून पडलेल्या पराराज्यातील कामगारांना परत गावी पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुखांना बस उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणीही झाली. यासाठी २० पेक्षा अधिक बसचा वापर झाला. या बसच्या चालकांनी कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविले. तथापि, या काळात जिल्ह्यातील एकाही चालकाला कोरोना संसर्ग झाला नाही.
-----------------
कोट : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार परराज्यातील कामगारांना घरी पोहोचविण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात एसटी बस उपलब्ध करण्यात आल्या होत्या. सर्व बसगाड्या केवळ राज्याच्या सीमेपर्यंतच पाठविण्यात आल्या. त्यापैकी आगारातील एकाही चालकाला कोरोना संसर्ग झाला नाही.
-विनोद इलामे,
आगार व्यवस्थापक, वाशिम
-----------------
कोट: लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर पोहोचविण्यासाठी काही चालकांना कामगिरी देण्यात आली होती. त्या सर्वांना कामगिरीचा मोबदला मिळाला आहे. प्रोत्साहन भत्त्याचा मात्र कोणताही प्रस्ताव किंवा प्रयोजन नव्हते. शिवाय त्यावेळी कोणत्याही चालकाला कोरोना संसर्ग झाला नव्हता.
-प्रतीक भगत,
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना,
आगार सचिव