आषाढी यात्रेत विठ्ठल भक्तांनी वाशिम आगाराला दिले १० लाखांचे उत्पन्न
By दिनेश पठाडे | Published: July 17, 2023 04:39 PM2023-07-17T16:39:20+5:302023-07-17T16:39:48+5:30
दरवर्षी हजारो वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला जातात, तर हजारो भाविक एसटी बसने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात.
वाशिम : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या वारीसाठी वाशिम आगारातून विशेष बस सोडण्यात आल्या. सर्वच बसेसला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आषाढी यात्रेत वाशिम आगाराला १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगार व्यवस्थापनाकडून सोमवारी देण्यात आली.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. दरवर्षी हजारो वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला जातात, तर हजारो भाविक एसटी बसने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दरवर्षी महामंडळाकडून विशेष बसगाड्या सोडल्या जातात. यंदाही या यात्रेसाठी विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. वाशिम आगारातून पंढरपूर यात्रेसाठी विशेष जादा बसगाड्यांची सुविधा परतीच्या प्रवासासह २५ जून ते ४ जुलैदरम्यान करण्यात आली.
भाविक आणि प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे, तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे गावी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळाने पार पाडली. शासनाने महिलांना ५० टक्के, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत आणि पूर्वीची ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत यामुळे लालपरीला गतवर्षीच्या तुलनेत मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले. आषाढी यात्रेनिमित्त सोडण्यात आलेल्या बसेसच्या माध्यमातून प्राप्त झालेले उत्पन्न संकलित करण्यात आले. ५० फेऱ्यांमधून ५ हजार भाविकांनी प्रवास केला त्यामध्ये १० लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे समोर आले. गतवर्षीपेक्षा यंदा ३ ते ४ लाख रुपयांचे अधिक उत्पन्न मिळाले.