सौर कृषीपंप योजनेतून मालेगावला ‘डच्चू’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 12:21 PM2020-10-14T12:21:44+5:302020-10-14T12:22:00+5:30
Solar Agri Pumps सौर कृषीपंप जोडणीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना आता भारनियमन व अन्य समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : सिंचन सुविधेसाठी महत्वपूर्ण म्हणून गणल्या जाणाऱ् या सौर कृषीपंप योजनेतून यंदा मालेगाव तालुक्याला डच्चू मिळाल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शेतकऱ्यांना सिंचन करणे सहज सुलभ व्हावे, २४ तास वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या उद्देशाने महावितरणतर्फे सौर कृषीपंप योजना राबविण्यात येत आहे. वीज भारनियमन, तांत्रिक बिघाड, जादा विद्युत देयक आदींमधून शेतकऱ्यांची सुटका व्हावी म्हणून या योजनेकडे शेतकऱ्यांचा कलही दिसून येतो. या योजनेकरीता पात्र शेतकऱ्यांमधून अर्जही मागविण्यात येतात. यंदा महावितरणच्या संकेतस्थळावर मालेगाव तालुक्याचे नाव दिसत नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले. सौर कृषीपंप जोडणीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना आता भारनियमन व अन्य समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. ज्यांच्याकडे विहिर, बोअरवेल अशी पाण्याची शाश्वत व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांना तरी या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या मागणीची दखल महावितरणतर्फे कशी घेतली जाते, यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.
वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार मालेगाव तालुक्यातील पाण्याची पातळी कमी असल्याच्या कारणावरून ही योजना मालेगाव तालुक्याककरीता लागू नाही. म्हणून संकेतस्थळावर नाव दिसणे बंद आहे.
- अनिल जीवनाणी,
कार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग मालेगाव