वाशिम जिल्ह्यात ‘इ-क्लास’ जमिनीवर शेततळ्यांसाठी ग्रामस्थ उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 02:34 PM2018-10-16T14:34:39+5:302018-10-16T14:35:03+5:30
वाशिम : भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात सुजलाम्-सुफलाम् अभियान राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात सुजलाम्-सुफलाम् अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गावोगावी जलसंधारणाची कामे प्रस्तावित केली जात असून ‘इ-क्लास’ जमिनींवर मोठ्या स्वरूपातील शेततळी खोदली जाणार आहेत. त्यासाठी अनेक गावांमधील ग्रामस्थ उत्सुक असून यासंदर्भात ग्रामपंचायतींकडूनही रितसर ठराव पारित केले जात आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले, की वाशिम जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमध्ये जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे प्रस्तावित करून संपूर्ण जिल्हा सुजलाम्-सुफलाम् करण्यासंबंधी युद्धस्तरावर जनजागृती केली जात आहे. यासाठी गावोगावी शिवारफेरी काढून जलसंधारणाचा जागर करण्यात आला. पुढच्या टप्प्यात प्रस्तावित कामांसंबंधी ग्रामपंचायतींनी ठराव घेवून प्रशासनाकडे सादर केले आहेत. बीजेएस आणि जिल्हा प्रशासनाने यासाठी ठेवलेल्या अटी बहुतांश ग्रामपंचातींनी मान्य करून कामे करण्यासाठी उत्साह दाखविला आहे. विशेषत: इ-क्लास जमिनींवर मोठ्या स्वरूपातील शेततळे खोदण्याची बाब या मोहिमेअंतर्गत प्रस्तावित असून ही कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत, असे हिंगे यांनी सांगितले.