आसेगाव येथे ई-क्लासवरील अतिक्रमण हटविले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:30 PM2020-06-28T17:30:48+5:302020-06-28T17:31:10+5:30
ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत रविवार २८ जून रोजी सरपंच आणि सदस्यांना घेराव घातला.
लोकमत न्युज नेटवर्क
आसेगाव (वाशिम): कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी जारी लॉकडाऊनदरम्यान बाहेरच्या काही लोकांनी गावातील आसेगाव येथील ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण करून गोदामे, दुकानांच्या बांधकामांची तयारी केली होती. याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत रविवार २८ जून रोजी सरपंच आणि सदस्यांना घेराव घातला. त्यानंतर लगेच या ई-क्लास जमिनीवर जेसीबी फिरवून बांधकामासाठी खोदलेले खड्डे बुजविण्यात आले.
केंद्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन जारी केले असताना बाहेरगावच्या काही लोकांनी आसेगाव येथे पोलीस स्टेशनच्या मागील भागात, तसेच मंदीर आणि ईदगाह परिसरातील १० एकर ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण करून गोदामे आणि दुकाने बांधण्याची तयारी केली होती. या संदर्भात गावातील बशीर शाह यांनी ग्रामपंचायत प्रशासन, तहसीलदारांसह जिल्हास्तरावरही निवेदन सादर करून अतिक्रमणावर कारवाईची मागणी केली होती. दखल न घेतल्यास आंदोलनाचा ईशाराही दिला होता. तथापि, त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे गावातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी २८ जून रोजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना घेराव घालत सदर अतिक्रमणावर तात्काळ कारवाईची मागणी केली. ग्रामस्थांचा आक्रमक पावित्रा बघताच सरपंच गजानन मनवर, उप सरपंच मुश्ताक कुरैशी, सदस्य नबी उल्लाह खान ठेकेदार, डॉ. शौकत खान, ताहेर अली खान, फिरोज पटेल, सुभाष भगत आणि मुख्तार कुरैशी आदिंनी संबंधित जागेवर पोहोचून बांधकामासाठी अतिक्रमित जमिनीवर खोदलेले खड्डे जेसबीने बुजवत जमीन समतल केली.