वाशिम जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी ई-पास आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 11:03 AM2020-05-04T11:03:40+5:302020-05-04T11:03:40+5:30
आॅनलाईन अर्ज करून ई-पास घरबसल्या प्राप्त करून घेण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात येण्यासाठी तसेच जिल्ह्यातून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी मजूर, कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी ई-पास प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. तथापि, संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करून ई-पास घरबसल्या प्राप्त करून घेण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
संकेतस्थळावर ई-पास मिळविण्यासाठी अर्ज करताना प्रारंभी ज्या जिल्ह्यात अथवा पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अडकलेले आहात, त्या जिल्हा अथवा शहराची निवड करावी. त्यानंतर अर्जामध्ये नमुद माहिती अचूकपणे भरावी. संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज भरताना फोटो, आधारकार्ड अथवा फोटो असलेले ओळखपत्र तसेच कोविड-१९ विषयक लक्षणे नसल्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर मिळणारा टोकन क्रमांक जतन करून ठेवणेही महत्वाचे आहे. जिल्हा प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर याच संकेतस्थळावर ई-पास उपलब्ध होईल. अर्ज भरल्यानंतर मिळालेला टोकन क्रमांक टाकल्यानंतर हा ई-पास आपणास प्राप्त करून घेता येईल. प्रवासामध्ये या ई-पासची प्रिंट सोबत ठेवणे आवश्यक आहे. ई-पास शिवाय कुणालाही वाशिम जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जिल्ह्याबाहेर जाण्यास देखील परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे संकेतस्थळावर योग्य माहिती भरुन ई-पास प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
मजूरांसाठी प्रक्रिया ठरतेय जाचक
परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात येऊ इच्छित असलेले मजूर, कामगारांपैकी अनेकांना संगणकीय ज्ञान अवगत नाही. ‘ई-पास’करिता नेमका अर्ज कसा करायचा, याबाबतची कुठलीही माहिती त्यांना नाही. अशा मजूर, कामगारांसाठी ‘ई-पास’ची प्रक्रिया जाचक ठरत आहे.