आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक संचांना बिघाडाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:18+5:302021-06-29T04:27:18+5:30

सर्व शासकीय प्रमाणपत्रे गावात आणि ऑनलाईन मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. यामुळे ...

Eclipse of computer sets in your government service center | आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक संचांना बिघाडाचे ग्रहण

आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक संचांना बिघाडाचे ग्रहण

Next

सर्व शासकीय प्रमाणपत्रे गावात आणि ऑनलाईन मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. यामुळे जन्म-मृत्यूचे दाखले, नाहकरत प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, जातीचे दाखले, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाण पत्र, उत्पन्नाचा दाखला आदी १३ प्रमाणपत्रासाठी ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना अर्जदारांना लांब रांगेत उभे राहणे आवश्यक नाही. ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आवश्यक ती कागदपत्रे मिळवू शकतात. ही सेवा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहेत; परंतु आता या सेवा केंद्रातील संगणक जुने झाल्याने त्यात वारंवार बिघाड होत असून, दिवसाला ८ संगणक नादुरुस्त होत असल्याची माहिती या यंत्रणनेशी निगडीत घटकांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील जनतेला वेळेत कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे.

------------------------

५० संगणक संच निकामीच

जिल्ह्यातील ४९१ आपले सरकार सेवा केंद्रांपैकी दरदिवशी ८ केंद्रांतील संगणकात बिघाड होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळणे कठीण होत आहे. त्यात जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील ५० संगणक संच निकामीच झाल्याने अडचणीत अधिकच वाढ झाली असून, हे संगणक कसेबसे दुरुस्त करून काम चालविण्याची कसरत यंत्रणेकडून केली जात आहे.

-----------------------

१० वर्षांपासून नवी खरेदीच नाही

आपले सरकार सेवा केंद्र योजना अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतीत या योजनेंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले. या सर्व केंद्रांसाठी २०११ मध्ये संगणक संचांची खरेदी करण्यात आली. आता दहा वर्षे उलटत आले असून, याच संगणक संचांच्याआधारे आपले सरकार सेवा केंद्रांचे काम सुरू असून, नवे संच खरेदीच करण्यात आलेले नाहीत.

--------------------

अनियमित वीज पुरवठ्याचा परिणाम

आपले सरकार सेवा केंद्राचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संगणकाकरिता वीज पुरवठा आवश्यक असतो; परंतु वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागांत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात. यातून संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर परिणाम होऊन त्यात बिघाड निर्माण होतो. त्यामुळेच आपले सरकार सेवा केंद्रातील संगणकात वारंवार बिघाड येत आहेत.

--------------------

दुरुस्तीसाठी आठवडाभराची प्रतीक्षा

वाशिम जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या हार्डवेअर इंजिनिअरकडून केले जाते. जिल्ह्यात एकाचदिवशी सहा ते आठ संगणक नादुरुस्त होत असतात आणि हे वेगवेगळ्या तालुक्यात घडते. संबंधित इंजिनिअरला एकाच दिवसांत सर्व तालुक्यात भेट देणे शक्य नसते. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात दुरुस्तीसाठी आठवड्याला कॅम्प घेतला जातो.

--------

ग्रामस्तरावर मिळणारी मुख्य कागदपत्रे

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या

तालुका - आपले सरकार केंद्र

वाशिम - ८४

कारंजा - ९१

मालेगाव -८३

रिसोड - ८०

मानोरा - ७७

मंगरुळपीर -७६

---------

कोट : आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. हे संगणक १० वर्षे जुने असून, त्यात आता वारंवार बिघाड होत असल्याने जनतेला सुरळीत सेवा देण्यात अडचणीत येत आहेत.

- शेखर हिरगुडे

आपले सरकार सेवा केंद्रचालक, वाशिम

-----

कोट : आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक संचांना बिघाडाचे ग्रहण लागले आहे. वारंवार संगणक बंद पडत असून, दुरुस्तीसाठी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागत असल्याने जनतेला वेळेत कागदपत्रे देणे कठीण झाले आहे.

- ज्ञानेश्वर मुखमाले,

आपले सरकार सेवा केंद्रचालक, मंगरुळपीर

तथा तालुकाध्यक्ष संगणक परिचालक संघटना

Web Title: Eclipse of computer sets in your government service center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.