शिक्षण विभागाची झाडाझडती
By Admin | Published: October 30, 2015 01:59 AM2015-10-30T01:59:46+5:302015-10-30T01:59:46+5:30
मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केली आकस्मिक पाहणी; नोंदवही ठेवण्याची सूचना.
संतोष वानखडे /वाशिम : पालकमंत्र्यांच्या दरबारात शिक्षक संघटनांनी प्राथमिक शिक्षण विभागाच्या दिरंगाई धोरणांची चिरफाड केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंंंत शिक्षण विभागाची झाडाझडती घेतली. यावेळी काही बाबतीत दिरंगाई आढळली असून, कामकाजात पारदर्शकता व नियमितपणा येण्यासाठी नोंदवही ठेवण्याचे निर्देश सीईओंनी दिले. जिल्हा परिषदेंतर्गत ७७४ प्राथमिक; तर ५ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांवर शेकडो शिक्षक कार्यरत असून, विद्यादानाचे कर्तव्य बजावित आहेत. भौतिक सुविधांचा अभाव, शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची रिक्त पदे, रखडलेली पदोन्नती प्रक्रिया, मासिक वेतनास विलंब, वैद्यकीय परिपूर्ती बिल, जीपीएफ मिळण्यासाठी होत असलेला विलंब आदी कारणांमुळे शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत राहत आला आहे. प्रलंबित समस्या निकाली काढणे आणि मासिक वेतन नियमित होण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी यापूर्वी शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या दालनात चर्चा केली. याच मुद्याच्या अनुषंगाने २३ ऑक्टोबर रोजी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींच्या समक्ष पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी शिक्षण विभागाची बैठक घेतली. शिक्षकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याबरोबरच वेतनास विलंब झाल्यास संबंधित अधिकार्यांविरूद्ध तातडीने कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले होते. पालकमंत्र्यांच्या बैठकीच्या अनुषंगाने शिक्षण विभागाचे कामकाज नेमके कसे चालत आहे, याची चाचपणी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी २८ ऑक्टोबरला अचानक भेट दिली. यावेळी नोंदवही नसल्याचे आढळून आले तसेच जुने प्रस्ताव प्रलंबित आणि नवीन प्रस्तांवाना तातडीने मंजुरी दिल्याची प्रकरणंही आढळून आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.