लोकमतचा दणका : अखेर मालेगाव येथे हरभरा खरेदीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:17 PM2020-05-29T17:17:28+5:302020-05-29T17:17:47+5:30
पहिल्याच दिवशी ४८७५ रुपये प्रती क्विंटल या दराने १६२० कट्टे हरभरा खरेदी करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : गोदाम उपलब्ध नसल्याच्या कारणावरून नाफेडची हरभरा खरेदी ठप्प असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २४ मे रोजी प्रकाशित केले होते. याची दखल घेत गोदाम उपलब्ध करण्यात आल्याने २९ मे पासून मालेगाव येथील केंद्रावर हरभरा खरेदी सुरू झाल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला.
सन २०१९ मध्ये रब्बी हंगामात परतीचा पाऊस झाल्याने मालेगाव तालुक्यात हरभरा शेतमालाचे बºयापैकी उत्पादन झाले. दरम्यान, बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने जिल्ह्यात शेतकºयांचा हरभरा नाफेडमार्फत खरेदी केला जात आहे; मात्र गोदामात हरभरा साठविण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याचे कारण समोर करून मालेगाव तालुक्यामध्ये नाफेडने हरभरा खरेदी करणे बंद केली होती. विशेष गंभीर बाब म्हणजे मालेगाव येथील वखार महामंडळाच्या गोदामात मंगरुळपीर आणि वाशिम तालुक्यातील हरभरा खरेदी करून साठविला जातो. गोदामाअभावी हरभरा खरेदी ठप्प असल्याने शेतकºयांना मातीमोल भावाने हरभरा विकण्याची वेळ आली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने २४ मे रोजी वृत्त प्रकाशित करून नाफेड व्यवस्थापन आणि बाजार समिती प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत मालेगाव-शिरपूर मार्गावरील एक गोदाम उपलब्ध करून देण्यात आला. परिणामी, २९ मे पासून हरभरा खरेदी सुरू झाली. पहिल्याच दिवशी ४८७५ रुपये प्रती क्विंटल या दराने १६२० कट्टे हरभरा खरेदी करण्यात आला.
गोदामाअभावी खरेदी बंद होती. परिणामी तालुक्यातील असंख्य शेतकरी अडचणीत सापडले होते. आता गोदाम उपलब्ध झाल्याने ही गैरसोय दूर झाली आणि खरेदी सुद्धा सुरू करण्यात आली.
- भगवानराव शिंदे, अध्यक्ष
तालुका खरेदी विक्री संस्था मालेगाव