प्राणी क्लेष प्रतिबंध कायद्याची होणार प्रभावी जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:40 PM2018-09-26T13:40:07+5:302018-09-26T13:40:35+5:30
वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ३ अन्वये पशू, प्राण्यांचे पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तीने त्या जनावरांची सर्वतोपरी काळजी घेणे बंधनकारक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ३ अन्वये पशू, प्राण्यांचे पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तीने त्या जनावरांची सर्वतोपरी काळजी घेणे बंधनकारक आहे. दरम्यान, या कायद्याची राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश कृषि, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने २५ सप्टेंबर रोजी दिले आहेत. त्याअनुषंगाने पश्चिम वºहाडातील जिल्ह्यांमध्ये जनजागृतीची नियोजन केले जाणार आहे.
१४ मार्च २०१७ च्या अधिसुचनेव्दारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पशूप्राण्यांच्या संरक्षणाकरिता प्राणी क्लेष प्रतिबंध सोसायटी स्थापन करण्यात आलेली आहे. त्याची हेल्पलाईन यापुढे प्रभावीरित्या वापरात आणली जावी, जिल्हास्तरावरील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये पशू, प्राण्यांच्या रक्षणासंबंधीची भिंतीपत्रके लावण्यात यावी, शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करावे, शक्य असल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून पथनाट्याव्दारे जनजागृती करावी, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा विषयसूचीत प्राणी क्लेष प्रतिबंध कायद्यासंबंधी विषय समाविष्ट करून चर्चा घडवून आणावी, असे निर्देश शासनाने जिल्हास्तरावर प्राणी क्लेष प्रतिबंध सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी आणि सचिव तथा जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्तांना दिले आहेत. यासंबंधी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पशूसंवर्धन विभागाच्या आयुक्तांकडे वेळोवेळी सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पाळीव प्राणी आणि पशूंच्या संरक्षणासाठी असलेल्या प्राणी क्लेष प्रतिबंध कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासंबंधी गावागावात जनजागृती केली जावी, यासाठी पुर्वीपासूनच प्रयत्न केले जात आहेत. यापुढेही जनजागृतीवर विशेष भर देण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना दिले जातील.
- लक्ष्मीनारायण मिश्रा
जिल्हाधिकारी, वाशिम