स्थलांतरितांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 04:51 PM2019-06-28T16:51:35+5:302019-06-28T16:51:44+5:30
शेलगाव बोदाडे येथील राजीव गांधी विद्यालयातील शिक्षक व स्काऊट, गाईडच्या पथकाने बुधवारी मोफत पाठ़्य पुस्तकांचे वितरण करून त्यांना शाळेत येण्याचे आवाहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: दुष्काळी स्थितीमुळे रोजगारासाठी भटकंती करीत असलेल्या मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित होत आहेत. अशाच काही मजुरांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोदाडे येथील राजीव गांधी विद्यालयातील शिक्षक व स्काऊट, गाईडच्या पथकाने बुधवारी मोफत पाठ़्य पुस्तकांचे वितरण करून त्यांना शाळेत येण्याचे आवाहन केले.
गतवर्षीच्या अल्प पावसामुळे राज्यातील हजारो गावांत दुष्काळ पडला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागांतील लाखो शेतमजुरांनी रोजगारासाठी परजिल्ह्यात स्थलांतर केले आहे. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोडसह मानोरा तालुक्यातील आणि बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील हजारो मजुरांनीही कामानिमित्त स्थलांतर केले असून, बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील काही मजूर मालेगाव तालुक्यात दगड फोडण्याच्या कामासाठी मुलाबाळासह आले आहेत. हे मजूर शेलगाव ते वाघळूद या रस्त्याच्या कामावर दगड फोडून आपल्या कुटुंबाचे उदरभरण करीत आहेत. त्यांच्यासोबत काही मुलेही असल्याची बाब शेलगाव बोदाडे येथीलराजीव गांधी विद्यालयाचे शिक्षक, तसेच राजीव गांधी स्काऊट पथक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गाईड पथकाच्या लक्षात आली. त्यामुळे या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून शालेय साहित्य खरेदी करून या मुलांना वितरीत केले, तसेच त्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण केली. स्काऊट शिक्षक पी. एम.कुटे यांनी २० पाट्या, लेखन डब्बे व गाईडनी वह्या, पेन्सील आणल्या. हे साहित्य मुख्याध्यापक व्ही. एस. जाधव यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक व काही पालकही ऊपस्थित होते. या उपक्रमासाठी ऋषिकेश वाझुळकर, गोपाल वाळले, गोपाल वाझुळकर, विशाल वाझुळकर, चेतन लहाने, तसेच भुमिका वाझुळकर, राजेश्वरी वाझुळकर, प्रांजल इंगोले, सानिका लहाने, स्नेहा खंदारे, वर्षा वाझुळकर यांनी सहकार्य केले.