बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:19 PM2018-07-18T12:19:29+5:302018-07-18T12:24:34+5:30
वाशिम : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके तसेच १५ ते ४९ वर्षे वयोगटातील मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
- संतोष वानखडे
वाशिम : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके तसेच १५ ते ४९ वर्षे वयोगटातील मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये वाशिमचा समावेश आहे.
राष्ट्रीय पोषण मिशनचे नाव बदलून पोषण अभियान असे नामकरण मे २०१८ मध्ये करण्यात आले असून, राज्यातील ३० जिल्ह्यांत पोषण अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात पोषण अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अभियानांतर्गत एकूण पाच उद्दिष्टे साधली जाणार आहेत.
अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहार पुरविला जातो. या अभियानांतर्गत आता महिला व बालकल्याण विभागाला अधिक सतर्क राहून उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने विविध विभागांशी समन्वय साधून कामकाज करावे लागणार आहे. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमधील खुजे, बुटकेपणाचे प्रमाण हे ६ टक्क्यांवरून प्रतिवर्षे २ टक्क्यांवर आणणे, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण हे ६ टक्क्यांवरून प्रतिवर्ष २ टक्क्यांवर आणणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण हे ९ टक्क्यांवरून प्रतिवर्ष ३ टक्क्यांवर आणणे, १५ ते ४९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण हे ९ ठक्क्यांवरून प्रतिवर्ष ३ टक्क्यांवर आणणे, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण ६ टक्क्यांवरून प्रतिवर्ष दोन टक्क्यांवर आणणे आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुषंगाने विविध विभागांशी समन्वय साधून महिला व बालकल्याण विभागाला नियोजन करावे लागणार आहे.
विविध स्तरावर उपक्रम राबविण्याच्या सूचना
पोषण दर्जा सुधारणे तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्याकरिता विविध स्तरावर उपक्रम राबविण्याच्या सूचना शासन स्तरावरून जिल्हास्तरीय यंत्रणेला प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुषंगाने शासनाकडून अंगणवाडी केंद्रांसाठी साहित्य व साधनसामग्रीदेखील टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाइल फोन व सीमकार्ड डाटाप्लॅनसह पुरविले जाणार आहे.
अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भात सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. शासन परिपत्रक व वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल.
- दीपककुमार मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम.