नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचा प्रयत्न ! - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:12 PM2018-05-08T16:12:34+5:302018-05-08T16:12:34+5:30
वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी केले.
वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी केले.
नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी ग्रामीण भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे नागरिकांना दूरध्वनीवरून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष सुरु करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या एकदिवस अगोदरच्या शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत १०७७ या टोल फ्री क्रमांकद्वारे अथवा ०७२५२-२३११२० या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांची तक्रार दाखल करून घेतली जाईल. त्याविषयीची आवश्यक कागदपत्रे ई-मेल अथवा ८३७९९२९४१५ या व्हाटसअप क्रमांकाद्वारे स्वीकारले जातील. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत निकाली न निघालेली तक्रार ई-लोकशाही कक्षात दाखल करता येईल. ई-लोकशाही कक्षासाठी लवकरच नवीन संगणक प्रणाली विकसित करून त्याद्वारे संबंधित तक्रारदाराला त्याच्या तक्रार अर्जाविषयीची सद्यस्थिती मोबाईल क्रमांकावर कळविली जाणार आहे.
ई-लोकशाही कक्षात दाखल झालेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल. या तक्रारींचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी प्रत्येक आठवड्याला याविषयी आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान यासारख्या संरक्षित सिंचन सुविधा निर्मितीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. कर्जमाफी योजना तसेच पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने सर्व संबंधित बँकांना सूचना देण्यात आल्या असून दोन दिवसात सर्व बँक अधिकाºयांची बैठक घेऊन याबाबतचा आढावा घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.