काय सांगता..? २० रुपयांत तब्बल आठ किलो टरबूज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:32 AM2021-05-31T08:32:07+5:302021-05-31T08:32:33+5:30
बाजारात टरबुजाची विक्री करण्याच्या वेळी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले.
कामरगाव (जि. वाशीम) : यंदा शेतकऱ्यांना नानाविध संकटाला सामोरे जावे लागत असून, कडक निर्बंध असल्याने कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांना २० रुपयांत आठ किलो टरबूज विकण्याची वेळ आली आहे.
सततच्या पावसाने मागील वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने खरिपातील तोटा रबीत भरून काढावा या उद्देशाने सिंचनाची सोय असलेल्या कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी शेती मशागतीपासून बियाणे व खते, खरेदी तसेच पुढील मशागतीसाठीही खर्च केला. बाजारात टरबुजाची विक्री करण्याच्या वेळी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले.
परिणामी, टरबुजाची विक्री थांबली. सुरुवातीला प्रतिकिलो दराने होणारी टरबुजाची विक्री नगावर येऊन पोहोचली. आणि त्याही पुढे जाऊन रविवारी २० रुपयांत दोन, अडीच किलोचे एक टरबूज याप्रमाणे चार टरबूज विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यामुळे शेतकरी गारद झाला आहे. टरबूज विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून लागवड खर्च निघणेही कठीण झाले आहे.