धरणातील झाडांवर अडकली आठ माकडे; युवकांनी राबविले ‘रेस्क्यू आॅपरेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:46 PM2019-08-03T13:46:19+5:302019-08-03T13:46:51+5:30
वनविभागाला कळवूनही संबंधित यंत्रणांनी विलंबाने घटनास्थळ गाठले. तोपर्यंत गावातील युवकांनीच ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवून सर्व माकडांची शिताफिने सुटका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : वाशिम जिल्ह्यात गेल्या ९ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यादरम्यान शुक्रवार, २ आॅगस्ट रोजी दुपारच्या सुमारास काही माकडे पळसखेड येथील धरणामध्ये असलेल्या झाडावर चढली; मात्र बराच वेळ झालेल्या पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढून ८ माकडे सुमारे २० तास झाडावरच अडकली. महसूल, वनविभागाला कळवूनही संबंधित यंत्रणांनी विलंबाने घटनास्थळ गाठले. तोपर्यंत गावातील युवकांनीच ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवून सर्व माकडांची शिताफिने सुटका केली.
पळसखेड येथील धरणाच्या सभोवताल मोठमोठी झाडे असण्यासोबतच धरण क्षेत्रातही झाडांची उगवण झाली आहे. यंदा हे धरण पूर्णत: कोरडे पडले होते. दरम्यान, २ आॅगस्ट रोजी धरणातील झाडांवर काही माकडे चढली; मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस होवून धरणाची पातळी वाढली आणि माकडे झाडावरच अडकली. त्यांची सुटका करण्यासाठी पळसखेड येथील युवकांनी पाण्यात उतरून तथा महत्प्रयास करून अखेर सर्व माकडांची झाडावरून सुटका केली. मदतकार्यासाठी पोलिस पाटील अरूण खरात, रुपराव खरात, अजय पाटील मानवतकर, अंकुश खरात, संजय सोनार, गौतम मोरे, गजानन शिंदे, बबन घुले, नाथा फड, सुनील ताकड, सिद्धार्थ मोरे, सतीश फड आदिंचा समावेश होता.