चौकशीसाठी आठ जण ताब्यात !
By admin | Published: October 30, 2015 01:58 AM2015-10-30T01:58:22+5:302015-10-30T01:58:22+5:30
मालेगाव दंगल प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू.
मालेगाव (जि. वाशिम): मालेगाव येथील मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूक दरम्यान दगडफेक, मारहाण व वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी २७ ऑक्टोबर रोजी नऊ दोषींसह अज्ञात जमावाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. दगडफेकप्रकरणी आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल असलेले आरोपी फरार आहेत. सोमवारला दगडफेकीची ही घटना घडल्यानंतर मंगळवारपयर्ंत मालेगाव शहर दहशतीखाली होते. बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी भेट घेऊन आढावा घेतला आणि जनजीवन सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले. बुधवारपासून मालेगाव शहर पूर्ववत होत असल्याचे दिसून आले. दंगलीच्या या घटनेला जबाबदार धरून दोषींविरूद्ध गुन्हे दाखल केले. दोषींना पकडण्याचे धाडसत्र सुरू झाले असून, शहरवासीयांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी मालेगावची बाजारपेठ पूर्ववत झाली. गुरूवारी जनजीवन पूर्वपदावर आल्याचे दिसून आले. मालेगावच्या घटनेवर व एकंदर परिस्थितीवर अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल व पोलीस अधीक्षक विनिता साहू लक्ष ठेवून आहेत. शहरवासीयांच्या एकतेतून शहर लवकरच पूर्वपदावर येत आहे. धार्मिक भावना दुखावणार्या फ्लेक्स प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नांदगावकर करीत असून आरोपीचा शोध घेत आहेत. घटनेच्या चवथ्या दिवशीही आरोपी पकडल्या गेले नाहीत. वाहन नुकसान प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलवंत यांच्याकडे असून ते ३५ सीसी कॅमेर्याच्या सहाय्याने तपास सुरु आहे.