आठ हजार निराधार ‘आधार’पासून वंचित!
By admin | Published: December 27, 2016 02:29 AM2016-12-27T02:29:00+5:302016-12-27T02:29:00+5:30
अद्याप सुमारे आठ हजार लाभार्थींनी आधार कार्ड काढले नसल्याची माहिती.
वाशिम, दि. २६-विविध स्वरूपातील योजनांच्या माध्यमातून निराधार लाभार्थींना शासनाकडून मानधन पुरविले जाते. मात्र, अशा लाभार्थींना यापुढे आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी ३0 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. असे असताना अद्याप सुमारे आठ हजार लाभार्थीेंनी आधार कार्ड काढले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या राज्यपुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य नवृत्ती वेतन योजना, केंद्रपुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विधवा नवृत्ती वेतन, राष्ट्रीय अपंग नवृत्ती वेतन व राष्ट्रीय कुटुंब आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
लाभार्थींचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या खात्यात जमा करणे शक्य व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर योजनांच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, याकरिता प्रशासनाने जिल्हाभर विविध टप्प्यात विशेष मोहीम राबविली. तत्पूर्वी प्रशासनाकडे जिल्ह्यातील ९२ हजार ५१६ लाभार्थींपैकी ७२ हजार ८७५ लाभार्थींनी आधार कार्ड सादर केले होते; तर विशेष मोहिमेंतर्गत त्यात आणखी ६ हजार ९३७ लाभार्थीच्या आधार क्रमांकाची भर पडली. प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील बाहेरगावी गेलेल्या ७१0 लाभार्थींसह सुमारे आठ हजार लाभार्थींचो आधार क्रमांक अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थींंचे नोव्हेंबर महिन्याचे मानधन थांबविण्यात आले आहे. सोबतच राज्य पुरस्कृत योजनांतील लाभार्थींसाठी आधार क्रमांक सादर करण्यास ३0 डिसेंबरपर्यंंत; तर केंद्रपुरस्कृत योजनांच्या लाभार्थींंसाठी १५ डिसेंबरपर्यंंतची मुदत देण्यात आली. परंतु त्याउपरही लाभार्थींंनी आपले आधार क्रमांक अद्याप सादर केलेले नाहीत.
तथापि, संबंधित लाभार्थींंना आधार क्रमांक सादर करण्यास आता केवळ चार दिवस शिल्लक असल्याने त्यांनी कुठलाही विलंब न लावता आधार कार्ड काढून त्याची प्रत प्रशासनाकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.