महाबीजचे आठ हजार क्विंटल बियाणे शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:48 PM2019-07-31T13:48:11+5:302019-07-31T13:48:15+5:30
सोयाबीनच्या ७ हजार ५०० क्विंटल बियाण्यांसह इतर पिकांचे जवळपास ५०० क्विंटल बियाण्यांची विक्रीच होऊ शकलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात यंदा महाबीजच्यावतीने ५५ हजार क्विंटलहून अधिक बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्यांना यंदाही प्रतिसाद दिला असला तरी, सोयाबीनच्या ७ हजार ५०० क्विंटल बियाण्यांसह इतर पिकांचे जवळपास ५०० क्विंटल बियाण्यांची विक्रीच होऊ शकलेली नाही. आता या बियाण्यांचा शेतमाल दराने विकण्याबाबत महाबीजच्या व्यवस्थापनाकडून विचार केला जात आहे.
महाबीजकडून वाशिम जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे ४३ हजार क्विंटल बियाणे वितरीत करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याशिवाय तूर, मुग, उडिद, ज्वारी, कपाशीसह इतर पिकांच्या बियाण्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यात तुरीचे प्रमाण ७०० क्विंटल होते. प्रत्यक्षात महाबीजने निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक बियाणे जिल्ह्यात उपलब्ध केले. त्यात सोयाबीनच्या विविध वाणांच्या ५३ हजार क्विंटल बियाण्यांचा समावेश होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकºयांनी महाबीजच्या बियाण्यांना पसंती दिली. त्यामुळेच सोयाबीन बियाण्यांचे उद्दिष्ट ४३ हजार क्विंटल असताना ४५ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली, तर इतर शेतमालाच्या बियाण्यांना शेतकºयांचा प्रतिसाद लाभला. तथापि, उपलब्ध करण्यात आलेल्या बियाण्यांपैकी सोयाबीनच्या विविध वाणांचे ७ हजार ५०० क्विंटल बियाण्यांसह इतर शेतमालाच्या जवळपास ५०० क्विंटल बियाण्यांची विक्री होऊ शकली नाही. हे बियाणे अद्यापही कृषीसेवा केंद्रधारकांकडे शिल्लक असून, आता या बियाण्यांची शेतमाल दराने विक्री करण्याबाबत महाबीज व्यवस्थापन विचार करीत आहे. (प्रतिनिधी)
लिलावाद्वारे होणार विक्री
महाबीजच्यावतीने बाजारात उपलब्ध करण्यात येणाºया बियाण्यांपैकी विक्री न झालेले बियाणे पुढील वर्षी उपयोगात आणले जाऊ शकत नाही. या बियाण्यांची उगवण क्षमता कमी होण्याची शक्यता असल्याने महाबीजकडून शिल्लक राहिलेले बियाणे कृषीसेवा केंद्रांकडून परत घेतले जाते. त्यानंतर शेतमालाच्या दरात हे बियाणे विकण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. आता यंदा विक्रीविना शिल्लक असलेले बियाणे कृषीसेवा केंद्रांकडून परत घेण्यात आल्यानंतर ते विकण्याचा निर्णय घेण्यात येईल आणि लिलाव पद्धतीने याची विक्री करण्यात येईल. मोबदल्याच्या प्रमाणानुसार या बियाण्यांची विक्री महाबीज व्यापाºयांना करेल.
जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक बियाण्यांची विक्री झाली आहे. आता शिल्लक राहिलेले बियाणे अद्याप संकलित करण्यात आलेले नाहीत. हे बियाणे संकलित केल्यानंतर विक्री किंवा इतर प्रक्रियेबाबत वरिष्ठस्तरावरून मार्गदर्शन घेण्यात येईल.
-विनोद जावरकर
क्षेत्र अधिकारी,
महाबीज , वाशिम