आठ गावे झाली हगणदरीमुक्त !
By admin | Published: November 5, 2015 01:35 AM2015-11-05T01:35:21+5:302015-11-05T02:16:53+5:30
मानोरा तालुक्यातील एकही गाव हगणदरीमुक्त नाही.
वाशिम : स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने ऑक्टोबरअखेर जिल्ह्यातील आठ गावे हगणदरीमुक्त करण्यात यश मिळविले आहे. मानोरा तालुक्यातील एकही गाव हगणदरीमुक्त होऊ शकले नाही, हे विशेष. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधकाम आणि हगणदरीमुक्त गाव, या दोन बाबींवर विशेष भर दिला जात आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असून, यामधील गावांत शौचालय बांधकाम मोठय़ा प्रमाणात केले जात आहे. पहिल्या टप्प्यात २८ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून, ११ हजार २९ शौचालयाचे बांधकाम केले जाणार आहे. ९ ऑगस्ट या क्रांतीदिनापासून जिल्हा परिषदेने ह्यसंपूर्ण स्वच्छतेची ऑगस्ट क्रांतीह्ण या नावाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेने ऑक्टोबरअखेर आठ गावे हगणदरीमुक्त घोषित केले असून, या गावांमध्ये १४७ शौचालयांचे बांधकाम झाले आहे. कारंजा तालुक्यातील तुळजापूर, धोत्रा जहागीर व डोंगरगाव, वाशिम तालुक्यातील साखरा, हिवरा रोहिला, रिसोड तालुक्यात केशवनगर, मालेगावात इरळा व मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव ही गावे हगणदरीमुक्त घोषित केली आहेत. अधिकाधिक गावे हगणदरीमुक्त करण्यासाठी दिवाळीनंतर २८ ग्रामपंचायतींमध्ये ह्यगूड मॉर्निंग पथकह्ण कार्यान्वित केले जाणार आहे. उघड्यावर शौचास जाणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी शौचालय बांधकाम करून त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले.