वाशिम जिल्ह्यात अठरा महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2022 02:31 PM2022-08-09T14:31:44+5:302022-08-09T14:32:16+5:30
पिके उध्वस्त: पावसाची सरासरी ८१ टक्क्यांवर
वाशिम : जुलैनंतर ऑगस्ट महिन्यातही पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. जिल्ह्यात सोमवार सकाळील ९ ते मंगळवारी ९ वाजतापर्यंत २४ तासांत सरासरी ६३.०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात १८ महसूल मंडळांंना अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने खरीप पिके नेस्तनाबूद झाली आहेत.
जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९.०० मि.मी. पावसाची नोंद होते. यंदा मान्सून लांबला आणि जून महिन्यात मासिक सरासरीच्या केवळ ६५ टक्के पाऊस पडला. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. तथापि, जुलैमध्ये पावसाने रूपच बदलून टाकले. या महिन्यात सततच्या पावसाने पिकांना मोठा फटका बसला, तर जनताही त्रस्त झाली होती. आता ऑगस्टमध्येही पावसाने धुमाकूळ घातला आहे. गत आठवड्यापासून पावसाचा धडाकाच सुरू आहे.
गुरुवार आणि शुक्रवारदरम्यानच्या २४ तासांत ४४.७० मि.मी. पावसाची नोंद झाली आणि यात ११ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला, तर सोमवार ८ ऑगस्ट ते मंगळवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजतापर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात ६३.०० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, तब्बल १८ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला.