मानोरा बाजार समिती सभापती पदासाठी उद्या निवडणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 03:21 PM2019-08-19T15:21:03+5:302019-08-19T15:21:09+5:30
रिक्त झालेल्या सभापती पदासाठी २० आॅगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदासाठी २० आॅगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. सभापती पदासाठी आपलीच वर्णी लागावी यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे तर दुसरीकडे सभापती निवडीवरुन सर्वसमावेशक आघाडीमध्ये उभी फुट पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरसिंग चव्हाण यांनी राजीनामा द्यावा यासाठी बाजार समितीच्या बारा संचालकांनी अविश्वास प्रस्तााव दाखल केला होता. परंतु अविश्वास प्रस्तावाला सामोरे न जाता सभापती चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. त्या अनुषंगाने सभापतीच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. मंगळवार २० आॅगस्ट रोजी सभापतीची निवडणूक होत असल्यामुळे अनेकांनी फिल्डींग लावली आहे. मानोरा बाजार समितीवर सर्वसमावेशक आघाडीची सत्ता आहे. सर्वसमावेशक आघाडीने बाजार समितीवर सत्ता काबीज करतांना पाच वर्षाच्या काळात तीन संचालकांना सभापती पदाचा मान देण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी सभापतींना ठरावीक कालावधीचा कार्यकाळ आखुन देण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे निवड केलेले सभापती विहित कालावधी संपल्यानंतरही राजीनामा देत नसल्यामुळे १२ संचालकांनी अविश्वास प्रस्तावाचे हत्यार उपसले होते. १२ संचालक एकवटल्याने सभापती चव्हाण यांनी राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे.
मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची एकूण संख्या १८ आहे. १७ संचालक हे सर्वसमावेशक आघाडीचे आहेत. परंतू, मध्यंतरी सभापतींनी राजीनामा न दिल्याने १२ सदस्य एकवटले तर त्यावेळी आघाडीचे पाच सदस्य तटस्थ राहिले होते. त्यामुळे तेव्हाच सर्वसमावेशक आघाडीमध्ये फुट पडली होती, अशी चर्चा आहे. १२ संचालकांनी अविश्वास दाखल करतेवेळी १२ पैकी काही संचालक यावेळी फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
(प्रतिनिधी)