पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणूक : मानोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी; रिसोड, मालेगावात सत्तांतर
By संतोष वानखडे | Published: October 15, 2022 06:17 PM2022-10-15T18:17:52+5:302022-10-15T18:17:52+5:30
Vashim News: वाशिम - जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती पदासाठी शनिवारी (दि.१५) निवडणूक झाली असून, मानोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी करीत भाजपाने ‘करेक्ट कार्यक्रम’ केला
संतोष वानखडे -
वाशिम - जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती पदासाठी शनिवारी (दि.१५) निवडणूक झाली असून, मानोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी करीत भाजपाने ‘करेक्ट कार्यक्रम’ केला तर वाशिम, कारंजा, मंगरूळपिरात महाविकास आघाडीने सत्ता कायम राखली. रिसोड, मालेगावात सत्ता परिवर्तन झाले.
वाशिम पंचायत समिती सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) राखीव असल्याने आणि त्यातच शिंदेसेनेने एन्ट्री केल्याने निवडणुकीपूर्वी चुरस निर्माण झाली होती. मात्र, ठाकरे गट आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी व अपक्ष सदस्यांना आपल्या तंबूत सहभागी करून घेत शेवटच्या क्षणी निवडणुकीचे चित्र पालटविले. सभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या (ठाकरे गट) सावित्रीबाई गोविंदराव वानखेडे तर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे गजानन गोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रतिस्पर्धी गटाकडून सभापती पदासाठी भाजपाच्या रत्नकलाबाइ नप्ते यांनी अर्ज भरला होता. सभापती पदाच्या निवडणुकीवेळी नप्ते व सहकारी सदस्य अनुपस्थित राहिल्याने सभापती म्हणून सावित्रीबाई वानखेडे तर उपसभापती म्हणून गजानन गोटे यांना विजयी घोषित करण्यात आले. विजयी उमेदवारांची समर्थकांनी जल्लोषात मिरवणूक काढली. रिसोड व मालेगावात सत्ता परिवर्तन झाले असून, मानोऱ्यात भाजपाने महाविकास आघाडीत बिघाडी करीत राकाॅंला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले. कारंजा पंचायत समितीच्या निवडणुकीत पूर्वीचेच समिकरण यावेळीही कायम राहिल्याने महाविकास आघाडीची सरशी झाली. डहाके गटाने वर्चस्व कायम राखले असून, सभापतीपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदीप यशवंतराव देशमुख तर उपसभापतीपदी वंचीत बहुजन आघाडीच्या अलका अंबरकर यांना विजयी घोषित करण्यात आले. मंगरूळपीर येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखाताई साहेबराव भगत, तर उपसभापतिपदी उषाताई भाऊराव राठोड यांची अविरोध निवड करण्यात आली.