वाशिम जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी १७ जानेवारीला निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:57 PM2020-01-11T12:57:16+5:302020-01-11T12:57:20+5:30
१३ जानेवारी रोजी पंचायत समितींच्या सभापती पदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यानुसार १६ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी तर १७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, १३ जानेवारी रोजी पंचायत समितींच्या सभापती पदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
वाशिम जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५२ असून, सत्ता स्थापनेसाठी २७ संख्याबळ आवश्यक आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक त्या संख्याबळाची जुळवाजूळव करण्याकरीता राकाँ, काँग्रेस, शिवसेना, जनविकास आघाडी, भारीप-बमसंतर्फे हालचाली सुरू झाल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पंचायत समितीचे सभापती व उपसभापती या पदाची निवडणूक केव्हा लागणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून होते. १० जानेवारी रोजी हा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्याने राजकीय घडामोडींनी वेग धरला. जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितींच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोमवार, १३ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत सभेचे आयोजन केले आहे. या सभेला वाशिम जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. १३ जानेवारी २०२० रोजी पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत झाल्यानंतर गुरुवार, १६ जानेवारी २०२० रोजी सर्व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे. वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवार, १७ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता वाशिम जिल्हा परिषद येथे होणार असून याकरिता पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वाशिम यांच्या अध्यक्षतेखालील विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात येईल.
दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच राकाँ, काँग्रेस, सेनेची महाविकास आघाडीसाठी गुप्त बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे राकाँ व अपक्षाला सोबत घेऊन भारिप-बमसं, जनविकास आघाडीनेही सत्तेत सहभागी होण्याकरीता चाचपणी केल्याची माहिती समोर येत आहे. येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे. या दोन दिवसात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला नाही तर धक्कादायक समिकरण जूळून येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.