सरपंच निवडणुकीने वातावरण तापले
By Admin | Published: August 22, 2015 01:17 AM2015-08-22T01:17:45+5:302015-08-22T01:17:45+5:30
सरपंचपदाला अर्थकारणाची झालर ; सहा टप्प्यात निवडणुका.
वाशिम : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी क्षमली असली तरी सरपंचपदाच्या निवडीसाठी राजकारण तापले आहे. १६३ ग्रामपंचायतीमधील सरपंच निवडणुकीची प्रक्रिया जिल्ह्यात सहा टप्प्यात पूर्ण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १९ आॅगस्ट रोजी रिसोड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक झाली आहे. आता २३ ते ३० आॅगस्ट दरम्यान उर्वरित १६१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची जिल्ह्यात निवडणूक होत आहे.
१४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना येत्या काळात मिळणार असल्याने सरपंचपदाला नेहमीच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक महत्त्व आले आहे. दुसरीकडे तालुकानिहाय सरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतींची मुदत संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सरपंचपदाच्या निवडीसाठी विजयी सदस्यांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे.
जिल्ह्यात पुढील काळात २३, २६, २८, २९ आणि ३० आॅगस्ट अशा पाच टप्प्यात सरपंचपदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सदस्यांची जुळवाजुळव करण्यासोबतच ग्राम पातळीवर राजकारण तापले आहे.
दुसरीकडे आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा २३ जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायती अविरोध झाल्या होत्या. त्यामुळे १५४ ग्रामपंचायतींच्या १२८१ सदस्यांसाठी प्रत्यक्षात ही निवडणूक झाली होती. त्यापूर्वी २४४ सदस्यांची अविरोध निवड झाल्याने प्रत्यक्षात १५२५ पैकी १२८१ सदस्यांच्या निवडीसाठी ही निवडणूक झाली होती. चार आॅगस्ट रोजी झालेल्या या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन लाख ७८६०४ मतदारांपैकी प्रत्यक्षात दोन लाख चार हजार ८८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ६ आॅगस्टला मतमोजणी होऊन विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.
दरम्यान, जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींपैकी रिसोड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींची सरपंच पदाची निवडणूक झाली असून, उर्वरित ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी आता ग्राम पातळीवर रस्सीखेच सुरू झाली आहे. तालुकानिहाय त्यासाठी वेगवेगळ््या तारखा जिल्हा निवडणूक विभागाने जाहीर केल्या आहेत.
ग्रामपंचायतींचा १४ व्या वित्त आयोगाचा थेट निधी मिळणार असल्याने या सरपंचपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
राजकारणही तापले आहे. तहसील कार्यालयाच्यावतीने निवडणुकीच्या अनुषंगाने नायब तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांची सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून नियक्त्याही केल्या असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.