शंभरापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याची वीज कपात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 07:10 PM2017-07-18T19:10:56+5:302017-07-18T19:10:56+5:30
वाशिम : जिल्ह्यातील शंभरापेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी थकीत विद्यूत देयक अदा करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे महावितरणने पाणीपुरवठा योजनेची विज खंडित करण्याची कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वारंवार आवाहन करूनही जिल्ह्यातील शंभरापेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडील थकीत विद्यूत देयक अदा करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे महावितरणने पाणीपुरवठा योजनेची विज खंडित करण्याची कारवाई केली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी मंगळवारी दिली.
जिल्ह्यातील ४९१ पैकी ४४३ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांना महावितरणकडून वीज पुरविली जाते. त्यातील २५८ ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे विद्यूत देयक अदा केलेले नाही. साधारणत: वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित असलेली विद्यूत देयकांची ही रक्कम ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे मार्च २०१७ या महिन्यापासूनच संबंधित थकबाकीदार ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेची विज खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली होती. त्यामुळे २५८ पैकी साधारणत: १५० ग्रामपंचायतींनी थकबाकी अदा करून विज पुरवठा सुरळित करून घेतला. मात्र, शंभरावर ग्रामपंचायतींनी अद्याप विद्यूत देयक अदा केलेले नाही. १७ जुलैअखेरच्या थकबाकीदार ग्रामपंचायतींमध्ये वाशिम तालुक्यातील २२, मालेगाव तालुक्यातील १९, रिसोड तालुक्यातील १८, मंगरूळपीर तालुक्यातील १४, मानोरा तालुक्यातील १२; तर कारंजा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनेची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली असून ती वसूल करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले आहे. संबंधित थकबाकीदार ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीपोटी किमान चालू महिन्याचे देयक आणि व जुन्या थकबाकीपैकी किमान ३0 ते ४0 टक्के रक्कम भरुन महावितरणला सहकार्य करायला हवे.
- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम.