देपूळ येथे दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 03:08 PM2018-12-11T15:08:27+5:302018-12-11T15:08:36+5:30
देपूळ (वाशिम) : येथील सिंगल फेज रोहित्र नादुरुस्त असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देपूळ (वाशिम) : येथील सिंगल फेज रोहित्र नादुरुस्त असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसाला केवळ तीन तास वीज पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करीत आहेत. महावितरण मात्र, या समस्येचे निराकरण करण्याची तसदी घेत नसल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे.
देपुळ येथील वीजग्राहकांना सिंगल फेज रोहित्रावरून वीज पुरवठा होतो. या रोहित्रावर दाब वाढल्याने ते २ महिन्यांपासून या रोहित्रात वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडीत होत आहे. दिवसा आणि रात्रीच्या २४ तासांत मिळून वीजग्राहकांना केवळ ३ तास वीज पुरवठा मिळत आहे. वीज पुरवठ्याअभावी वीजेवर आधारीत लघू व्यवसाय ठप्प झाले असून, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे. गृहिणीही अनियमित वीज पुरवठ्याने त्रस्त झाल्या आहेत. गावातील विजेची समस्या निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार महावितरणकडे मागणीही केली; परंतु त्याची दखल अद्यापही घेण्यात आली नाही.
देयक न भरण्याच्या इशाºयाकडेही दुर्लक्ष
देपूळ येथे २ महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. त्यामुळे वीजग्राहक गजानन वाघमारे यांच्या नेतृत्वात इतर ग्राहकांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता तायडे आणि उपविभागीय अभियंता जांभुळकर यांची २२ नोव्हेंबर रोजी भेट घेत ही समस्या निकाली काढण्याची मागणी केली आणि दखल न घेतल्यास वीजदेयक अदा न करण्याचा इशाराही दिला. या प्रकाराला १८ दिवस उलटले तरी, महावितरणने या समस्येचा निपटारा केला नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संतापाची मोठी लाटच उसळली आहे.