वाशिम जिल्ह्यात अकरावीच्या ३,१५६ जागा रिक्त ; शिक्षकांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:42 AM2020-12-16T11:42:44+5:302020-12-16T11:47:13+5:30
Washim Education Sector News आतापर्यंत २३,५०० पैकी २०,३४४ प्रवेश झाले, तर ३,१५६ जागा रिक्त राहिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर यंदा अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली असून, आतापर्यंत २३,५०० पैकी २०,३४४ प्रवेश झाले, तर ३,१५६ जागा रिक्त राहिल्या आहेत.
यावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १९ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २३ हजार ५०० जागा उपलब्ध असल्याने जागांचा तुटवडा नाही.
शिक्षक संख्येवर परिणाम ?
जिल्ह्यात अकरावीच्या २३ हजार ५०० जागा आहेत. यापैकी ३,१५६ जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका तर नाही ना? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, यंदा काही तुकड्यांची वाढ झाल्याने एकूण प्रवेशित जागांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येते.
मागील वर्षीची स्थिती
गेल्यावर्षी कला शाखेसाठी १०,८८०, विज्ञान शाखेसाठी ९,४४०, वाणिज्य शाखेसाठी ६४०, तर अन्य शाखेसाठी ८०० जागा होत्या. गेल्यावर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी कमी लागल्याने प्रवेशित एकूण जागांपैकी जवळपास ४ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा ३,१५६ जागा रिक्त राहिल्या आहेत..