पात्र कामगारास मिळणार साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:46 PM2018-03-07T18:46:44+5:302018-03-07T18:46:44+5:30
वाशिम : कुटुंबाऐवजी आता प्रत्येक कामगारास अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचा अध्यादेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ७ मार्च रोजी पारित केला.
वाशिम : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत तथा पात्र बांधकाम कामगारांच्या कुटूंबास पुर्वी आवश्यक अवजारे खरेदी करण्यासाठी ५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जायचे. त्यात सुधारणा करित कुटुंबाऐवजी आता प्रत्येक कामगारास अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचा अध्यादेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ७ मार्च रोजी पारित केला. यामुळे गोरगरिब तथा गरजू बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे पात्र बांधकाम कामगारांची नोंद झाल्यानंतर लगेच त्याला ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया अवलंबावी. तसेच पुढील तीन वर्षानंतर त्यास सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची मंडळाकडे सलग तीन वर्षे नोंदणी असणे आवश्यक असल्याचे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कुटुंबाऐवजी नोंदणीकृत तथा पात्र प्रत्येक बांधकाम कामगारास कुदळ, फावडे, थापी यासह इतर बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी व्यक्तीश: ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्याकरिता बांधकाम कामगारांच्या अनेक संघटनांनी पाठपुरावा केला होता. त्यास यामुळे यश मिळाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
पुर्वी बांधकाम कामगारांच्या कुटुंबास ५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जायचे. यामुळे मात्र कुटुंबातील अनेकांना एकाचवेळी ते साहित्य वापरणे अशक्य व्हायचे. शासनाने यात केलेल्या बदलामुळे आता नोंदणीकृत प्रत्येक कामगारास साहित्य घेण्यासाठी अर्थसहाय्य केले जाणार असून कामगारांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे.
- पी.आर. महल्ले, सरकारी कामगार अधिकारी, वाशिम