बाप्पांच्या विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्थेवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 04:38 PM2019-09-11T16:38:06+5:302019-09-11T16:38:20+5:30
प्रकल्पांत पुरेसे पाणी नाही, विहिरीसुद्धा आटल्याने यंदा लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी कृत्रिम तलाव व अन्य पर्यायावर भर दिला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. ग्रामीण आणि शहरी भागात मिळून जिल्ह्यात ६८३ मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाची स्थापना केली. गणेशोत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात येत असला तरी, यंदा अपुऱ्या पावसामुळे प्रकल्पांत पुरेसे पाणी नाही, विहिरीसुद्धा आटल्याने यंदा लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी कृत्रिम तलाव व अन्य पर्यायावर भर दिला जात आहे.
वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७९८.७० मि. मी पाऊस पडतो; परंतु यंदा सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा अर्धा उलटला तरी, ६७ टक्केही पाऊस जिल्ह्यात पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत अपेक्षीत जलसाठा झालेला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४१ प्रकल्पांत अद्यापही मृतसाठाच आहे. तर १० प्रकल्पांत शुन्न ते १० टक्के, २८ प्रकल्पांत २५ पेक्षा अधिक आणि केवळ १६ प्रकल्पांत ५० पेक्षा अधिक साठा झाला आहे. आता पावसाळ्याचे केवळ २५ दिवस उरले असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प पूर्णपणे भरण्याची शक्यताच धुसर झाली आहे. त्यामुळे यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचेही स्पष्ट दिसत आहे. अशात प्रकल्पांत साठलेले पाणी टिकविणे आणि ते दुषित होण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्मिती यासह अन्य पयार्यावर भर देण्यात येत आहे.
वापरात नसलेल्या जलाशयांचा होणार वापर
जिल्ह्यांत यंदा अपुरा पाऊस असल्याने बहुतांश जलाशये कोरडी आहेत. त्यात प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने केले. त्यामुळे गणेशभक्तांना बाप्पांना निरोप देण्यात अडथळे येऊ नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाने ज्या जलाशयांतील पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही, असा एक जलाशय निश्चित करून तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जनाची सोय करावी, अशा सुचना तहसीलदारांना देण्यासह, शहरांतर्गत गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्मितीच्या सुचना नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली.
जिल्ह्यातील प्रकल्पांत उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे; परंतु यामुळे गणेश विसर्जनात अडथळे येऊ नयेत म्हणून पिण्यायोग्य पाणी नसलेले जलाशय शोधून ते गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यासह शहरांतर्गत कृत्रिम तलाव तयार करण्याच्या सुचनाही तालुकास्तरावर देण्यात येणार आहेत.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम