गोवर्धना येथील नागरिकांच्या लसीकरणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:40+5:302021-04-23T04:43:40+5:30
गोवर्धना येथे मागील पंधरा दिवसांत ७६२ नागरिक कोरोनाबाधित झाल्याचे निदान झाले. त्यापैकी सहाजणांचा मृत्यू झाला आहे. १२३ जण बरे ...
गोवर्धना येथे मागील पंधरा दिवसांत ७६२ नागरिक कोरोनाबाधित झाल्याचे निदान झाले. त्यापैकी सहाजणांचा मृत्यू झाला आहे. १२३ जण बरे झाले आहेत. ६३३ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. गोवर्धन येथेही काही दिवसांपूर्वीच कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, येथील बहुतांश नागरिकांनी लसीकरणाबद्दल उदासीनता बाळगून लसीकरण करून घेण्याचे टाळले, अशी माहिती आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली आहे. परिणामत: पुढील काळात गोवर्धना येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढली. दरम्यान, आरोग्य विभागाकडून गोवर्धना येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन गावातील नागरिकांची कोरोना चाचणी केली. गावात लसीकरणासाठी कॅम्प लावला होता. ४५ हून अधिक वर्षे वयोगटातील १५१२ नागरिक गावात आहेत. त्यापैकी १०० जणांनी मांगुळ झनक प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण केले, तर पाच दिवस गावात लावलेल्या कॅम्पमध्ये केवळ १६० जणांनी लस घेतली. गोवर्धना येथील नागरिकांनी लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, आमदार अमित झनक यांनी गोवर्धना येथे भेट देऊन गोवर्धना येथील नागरिकांनी कुठलीही शंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.