ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणावर भर - रमेश तांगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 06:53 PM2020-10-31T18:53:23+5:302020-10-31T18:55:55+5:30
Washim News माध्यमिक शाळांमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे.
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळांमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. यंदा चित्रकला, शालेय क्रीडा स्पर्धा यासह अन्य परीक्षाही प्रभावित झाल्या आहेत. अकरावीमधील प्रवेश प्रक्रिया पुर्णत्वाकडे येत आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांच्याशी शनिवारी संवाद साधला असता, जिल्ह्यात ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणावर भर दिला जात असल्याचे ते म्हणाले.
कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली नाही. विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकविण्यात येत आहे?
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या सुचनेनुसार सध्या वर्ग सुरू झाले नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल किंवा संगणकाची व्यवस्था नाही, अशा विद्यार्थ्यांना समुदाय पद्धतीने शाळा परिसरात, घरी जाऊन आॅफलाईन पद्धतीने शिकविण्यात येत आहे. यावेळी ‘कोविड-१९’च्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत. त्यानुसार या सुचनांचे पालनही होत आहे.
अकरावी प्रवेशाबाबत काय सांगाल?
जिल्ह्यात यावर्षी आॅफलाईन पद्धतीने शाळा स्तरावरच अकरावीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. आतापर्यंत ही प्रवेश प्रक्रिया ८० टक्के पूर्ण झाली आहे. शासकीय व अनुदानित शाळेत अकरावी प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. कुणाच्या तक्रारी असतील तर शिक्षण विभाग स्तरावर तक्रारीचे निराकरण करण्याची व्यवस्थादेखील केली आहे. दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या तुलनेत अकरावीतील प्रवेशित जागांची संख्या जास्त असल्याने प्रवेशापासून कुणीही वंचित राहणार नाही.
कोरोनामुळे चित्रकला परीक्षा, शालेय क्रीडा स्पर्धा प्रभावित झाल्या, याबाबत काय सांगाल?
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा स्तरावर गर्दी होणार नाही, याची दक्षता वरिष्ठ स्तरावरूनच घेतली जात आहे. शाळा सुरू झाल्यानंतर चित्रकला परीक्षा, शालेय क्रीडा स्पर्धा व अन्य मुद्याच्या अनुषंगाने वरिष्ठ स्तरावर योग्य तो निर्णय होईल. या निर्णयाची अमलबजावणी जिल्ह्यात केली जाईल.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासंदर्भात आतापर्यंत मुख्याध्यापकांच्या तीन ते चार वेळा आॅनलाईन पद्धतीने बैठका घेण्यात आल्या. विद्यार्थी, पालकांच्या तक्रारींचा निपटारा शक्यतोवर शाळा स्तरावर करावा, अशा सूचना सर्वांना दिल्या आहेत.