ग्रामीण भागात लसीकरण जनजागृतीवर भर द्यावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:56+5:302021-07-15T04:27:56+5:30
वाशिम : नीती आयोग, जिल्हा प्रशासन आणि पिरॅमल फाैंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ या अभियानांतर्गत जिल्ह्यात कोरोना ...
वाशिम : नीती आयोग, जिल्हा प्रशासन आणि पिरॅमल फाैंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ या अभियानांतर्गत जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृतीवर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या. या अभियानाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, पिरॅमल फाैंडेशनचे अमित गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे. पिरॅमल फाैंडेशनच्या माध्यमातून लसीकरणबाबत ग्रामीण भागामध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा. जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांची यासाठी मदत घ्यावी. ज्या गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा गावांतील लोकांशी संपर्क साधून त्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
पिरॅमल फाैंडेशनचे गोरे यांनी, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. पिरॅमल फाैंडेशनमार्फत १०० स्वयंसेवक यामध्ये कार्यरत राहतील, असे त्यांनी सांगितले.
000000
महिलांमधील गैरसमज दूर करावेत !
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत दुसरा डोस घेण्यासाठी पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच महिलांमध्ये सुद्धा लसीकरणाविषयी काही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. सध्या प्रत्येक तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हे लसीकरणाविषयी जनजागृती मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून काम करीत आहेत, पिरॅमल फौंडेशनने त्यांच्यासोबत संपर्क करून त्यांना सहकार्य केल्यास लसीकरणाची गती वाढण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या.