आरक्षणासाठी कर्मचारी महासंघ आक्रमक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:32+5:302021-06-21T04:26:32+5:30
अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील ३३ टक्के कर्मचा-यांना पदोन्नतीत आरक्षण दिले जात ...
अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील ३३ टक्के कर्मचा-यांना पदोन्नतीत आरक्षण दिले जात आहे. परंतु, राज्य शासनाने ७ मे २०२१ रोजी शासन निर्णय पारित करीत पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण संपुष्टात आणले आहे. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांच्या राखीव कोट्यातील सर्व रिक्त जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे शासनाचे निर्देश असून, या निर्णयानुसार कार्यवाही करण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी व कर्मचा-यांवर एकप्रकारे अन्याय असून, या अन्यायाविरोधात राज्यातील विविध मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी संघटना यांनी एकत्र येऊन राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समिती तयार केली आहे. पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समितीने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २६ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयात मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातही २६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा निमंत्रक विश्वनाथ महाजन यांनी केले.