कर्मचाऱ्यांच्या सण अग्रीम मर्यादेत अडीच हजारांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:59 PM2018-10-24T12:59:55+5:302018-10-24T13:00:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच सण अग्रिम मर्यादेत २३ आॅक्टोबर रोजी अडीच हजार रुपयांची वाढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच सण अग्रिम मर्यादेत २३ आॅक्टोबर रोजी अडीच हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने येत्या दिवाळीला १२५०० रुपये अग्रिम मिळणार आहे. त्याअनुषंगाने कर्मचाऱ्यांनी बुधवारपासूनच नियोजनला सुरूवातही केल्याचे दिसून आले.
विविध सण, उत्सवादरम्यान पैशाची आगाऊ तरतूद व्हावी याकरीता शासनातर्फे अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सण अग्रीम दिला जातो. गतवर्षापर्यंत ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४८०० रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये सण अग्रीम दिला जात होता. यामध्ये वाढ करण्याची मागणी विविध कर्मचारी व अधिकारी महासंघ व संघटनांनी राज्य शासनाकडे केली होती. या मागणीची सकारात्मक दखल घेण्यात आली असून, अडीच हजार रुपयांची वाढ केली आहे. येत्या दिवाळीपूर्वी ४८०० रुपयांपेक्षा अधिक ग्रेड वेतन नाही अशा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १२५०० रुपये सण अग्रीम मिळणार आहे. वर्षातील १० सणांसाठी ही अग्रिम देण्यात येते. यामध्ये दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस, पारसी नववर्ष, संवत्सरी, रोश-होशना, वैशाखी पौर्णिमा अर्थात बुद्ध जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा समावेश आहे. आगामी दिवाळीचा सण लक्षात घेता जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यासह अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाºयांनी सण अग्रिमचा लाभ घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू केल्याचे बुधवारी दिसून येते.
दरम्यान, सण अग्रिम मर्यादेत वाढ करण्याची मागणी कर्मचारी महासंघ, संघटनांनी केली होती. आता यामध्ये वाढ झाल्याने याचा फायदा कर्मचाºयांना मिळणार आहे, असे जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव रुपेश निमके, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय धुमाळे, जिल्हा सचिव हरिनारायण परिहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.