‘समाजकार्य’च्या कर्मचा-यांचे वेतन थकले!

By admin | Published: March 31, 2017 02:25 AM2017-03-31T02:25:04+5:302017-03-31T02:25:04+5:30

४२ कुटुंबांवर उपासमारीची वेळ; डिसेंबर २0१६ पासून प्रश्न कायम.

Employees of 'social work' tired of paying! | ‘समाजकार्य’च्या कर्मचा-यांचे वेतन थकले!

‘समाजकार्य’च्या कर्मचा-यांचे वेतन थकले!

Next

वाशिम, दि. ३0- स्थानिक सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकूण ४२ कर्मचार्‍यांचे वेतन थकल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. यातील १२ कर्मचार्‍यांचे वेतन डिसेंबर २0१६ पासून, तर उर्वरित ३0 कर्मचार्‍यांचे वेतन जानेवारी २0१७ पासून थकले आहे.
वाशिम येथे सरस्वती समाजकार्य महाविद्यालय एका संस्थेमार्फत चालविले जाते. या महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी सामाजिक शास्त्रांतील विविध विषयांचे ज्ञानार्जन करीत असतात. या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्रांच्या आधारे समाजकार्याचे धडे देण्यासाठी प्राध्यापक आणि इतर कार्यालयीन कामकाजासाठी शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून निधी प्राप्त होत असतो; परंतु मागील दोन महिन्यांपासून या कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शासनाकडून निधीच प्राप्त झाला नसल्याने आणि यातील १२ कर्मचार्‍यांच्या वेतनाची देयके तांत्रिक अडचणीमुळे विलंबाने पाठविल्याने डिसेंबर २0१६ पासून, तर उर्वरित कर्मचार्‍यांचे वेतन जानेवारी २0१७ पासून थकले आहे. आता मागील तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याने, या कर्मचार्‍यांना आपल्या कुटुंबाच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. काहींनी गरजा पूर्ण करण्यासाठी उसणवार केली आहे. वेतनच मिळाले नसल्याने त्यांची अनेक आवश्यक कामे खोळंबली आहेत. खासगी देणीघेणी, विम्याचे हप्ते, वीज देयके, किराणाचे बिल थकले आहेच, शिवाय लग्नसराईच्या दिवसांत हाती पैसा नसल्याने समाजात नातेवाइकांच्या लग्नकार्यासह इतर सामाजिक कार्यक्रमांत जाणेही या कर्मचार्‍यांना अवघड झाल्याचे दिसत आहे. वेतन मिळावे, अशी अपेक्षा असली तरी, त्यासाठी या कर्मचार्‍यांना महाविद्यालय व्यवस्थापनाबाबत काही सांगता येत नाही. यासंदर्भात महाविद्यालयातील लेखा विभागाच्या कर्मचार्‍यांकडून माहिती घेतली असता, महाविद्यालयातील १२ कर्मचार्‍यांचे अँरिअर्स काढायचे होते. या अँरिअर्समुळे त्यांचे डिसेंबर महिन्यातील देयकायचे बिल सादर करण्यास विलंब झाला, तर इतर ३0 कर्मचार्‍यांसह ४२ कर्मचार्‍यांची वेतन बिले सादर करण्यात आली असली तरी, शासनाकडून निधीच प्राप्त झाला नसल्याने वेतन अदा करणे शक्य झाले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Web Title: Employees of 'social work' tired of paying!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.