खासगी इसमाचे प्रोत्साहन भोवले, पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
By दिनेश पठाडे | Published: February 7, 2023 08:58 PM2023-02-07T20:58:58+5:302023-02-07T20:59:50+5:30
७ फेब्रुवारीला सापळा रचून कारवाई करण्यात आली.
दिनेश पठाडे, वाशिम : रिसोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत करण्याकरिता तसेच जमा असलेली मोटरसायकल व मोबाइल तक्रारदार यांना परत देण्याकरिता १० हजारांची लाच घेताना एसीबीने पोलिस हवालदारास रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई रिसोड पोलिस ठाणे परिसरात मंगळवारी (दि. ७) रोजी करण्यात आली.
तक्रारदार यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन रिसोड येथे दाखल गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत करणे, पोलिस स्टेशनला जमा असलेली मोटरसायकल व मोबाइल तक्रारदारास देण्यासाठी पोलिस हवालदार विशाल ऐकाडे यांनी ६ फेब्रुवारी रोजी पडताळणी कारवाईदरम्यान २० हजार रुपये लाचेची मागणी करून १० हजार रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शवली. खासगी इसम संतोष काळदाते यांनी त्यांना सदर रक्कम स्वीकारण्याचे प्रोत्साहन दिले. त्यानंतर ७ फेब्रुवारीला सापळा रचून कारवाई करण्यात आली.
यावेळी पोलिस हवालदार विशाल कुंडलिक ऐकाडे यांनी पोलिस स्टेशन रिसोड इमारतीच्या आवारात लाच रक्कम १० हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारले. त्यावरून त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध रिसोड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक गजानन शेळके, पोलिस निरीक्षक महेश भोसले, नितीन टवलारकर, दुर्गदास जाधव, विनोद मार्कंडे, योगेश खोटे, रवी घरत, समाधान मोघड, शेख नावेद यांच्या पथकाने केली. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपाधीक्षक गजानन शेळके यांनी केले.
खासगी इसमाने दिले प्रोत्साहन
शासकीय काम करून देण्यासाठी खासगी इसमाचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला असल्याचे पाहावयास मिळत आहे. तर काही अधिकारी, कर्मचारी लाच स्वीकारण्यासाठी खासगी इसमाचा वापरदेखील करतात. पोलिस हवालदार विशाल ऐकाडे यांना खासगी इसमाने प्रोत्साहन दिल्याने त्यांनी लाच स्वीकारली. त्यामुळे खासगी इसमाचे ऐकणे पोलिस जमादारास चांगलेच महागात पडले असून त्याच्यांसह खासगी इसमही कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"