वाशिम शहरात अतिक्रमण मोहीम गतीमान; मुख्य रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By सुनील काकडे | Published: May 12, 2023 07:26 PM2023-05-12T19:26:32+5:302023-05-12T19:26:32+5:30
विशेष म्हणजे याकामी कार्यान्वित असलेले तीन जेसीबी देखील कमी पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
वाशिम : अतिक्रमण हटाव मोहिमेचा १२ मे रोजी चाैथा दिवस होता. यादिवशी अतिक्रमण निर्मुलन पथकाचा पूर्ण दिवस बालाजी काॅम्प्लेक्स परिसरात तुलनेने मोठ्या प्रमाणात वाढलेले अतिक्रमण हटविण्यातच गेला. विशेष म्हणजे याकामी कार्यान्वित असलेले तीन जेसीबी देखील कमी पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहराला अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी मिन्नू पी.एम. यांनी गेल्या चार दिवसांपासून धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चमू आणि चोख पोलिस बंदोबस्तात कुणाचीही गय न करता अतिक्रमण हटविण्यात येत आहे.
दरम्यान, १२ मे रोजी सकाळपासूनच अतिक्रमण निर्मुलन पथकाने बालाजी काॅम्प्लेक्स परिसरात डेरेदाखल होत टिनपत्र्याच्या खोक्यांसह पक्क्या अतिक्रमणावरही जेसीबीचा प्रहार केला. यादरम्यान काही अतिक्रमणधारकांकडून झालेल्या विरोधालाही जुमानन्यात आले नाही. अतिक्रमणात आलेले पक्के बांधकामही यावेळी पाडण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.
शहरातून पालिकेवर काैतुकाचा वर्षाव
गेल्या चार दिवसांपासून कुठेही भेदभाव न करता अतिक्रमणात आलेली कच्ची, पक्की दुकाने हटविण्याची धडक कारवाई केली जात आहे. यामुळे शहरातून पालिकेवर काैतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, हटविण्यात आलेल्या अतिक्रमणाची स्थिती भविष्यात पुन्हा ‘जैसे थे’ होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.