वनविभागाच्या ४५५ हेक्टर जमीनीवर अतिक्रमण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 08:39 PM2017-08-26T20:39:17+5:302017-08-26T20:47:09+5:30
वाशिम जिल्हयातील वनविभागाच्या ताब्यातील सुमारे १२०० एकरपेक्षा अधिक जमिनीवर अतिक्रमण झाले असून महसूल विभागाकडून झालेल्या चुकीच्या क्षेत्र मोजणीमुळे ते हटविणे अशक्य ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हयातील वनविभागाच्या ताब्यातील सुमारे १२०० एकरपेक्षा अधिक जमिनीवर अतिक्रमण झाले असून महसूल विभागाकडून झालेल्या चुकीच्या क्षेत्र मोजणीमुळे ते हटविणे अशक्य ठरत आहे. परिणामी, वनाच्छादित क्षेत्र वाढविणेही कठीण झाल्याची माहिती सुत्रानी शनिवार, २६ आॅगस्टला दिली.
जिल्ह्यातील वाशिम-रिसोड वनपरिक्षेत्रात ६५०६ हेक्टरचा परिसर वनाच्छादित असून त्यापैकी १२४ हेक्टर अर्थात ३१० एकरवर अतिक्रमण आहे. त्यात शिरपूटी (ता.वाशिम) येथे ३६ आणि वाकद (ता.रिसोड) येथे ८८ हेक्टरचा समावेश आहे. मानोरा तालुक्यात १३ हजार २६० हेक्टरचा परिसर वनविभागाच्या ताब्यात असून त्यापैकी ४३ हेक्टरवर अतिक्रमण झालेले आहे. कारंजात ८ हजार हेक्टरपैकी ८८.८१ हेक्टर; तर मेडशी वनविभागांतर्गत एकूण १० हजार हेक्टर क्षेत्रापैकी २०० हेक्टरच्या आसपासचा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.
दरम्यान, वनविभागाकडून हे अतिक्रमण हटविण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला; परंतू महसूल विभागाकडून यापुर्वी झालेल्या शेतीच्या मोजण्यांमध्ये बºयाचशा चुका झाल्याने तद्वतच गेल्या अनेक वर्षांपासून शेती क्षेत्र वाढविण्याच्या नादात वनविभागाच्या ताब्यातील जमिनी काही शेतकºयांनी बळकावल्यामुळे अतिक्रमण हटवताना त्रास होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
वनविभाग | एकूण क्षेत्र | अतिक्रमित क्षेत्र |
वाशिम-रिसोड | ६,५०६ हेक्टर | १२४ हेक्टर |
कारंजा-मानोरा | २१,२६० हेक्टर | १३१ हेक्टर |
मेडशी-मालेगाव | १०,००० हेक्टर | २०० हेक्टर |
वनविभागाच्या जमिनींवर झालेले अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही निरंतर सुरू आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याने निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. अतिक्रमणधारकांनीही कारवाई टाळण्यासाठी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढायला हवे.
- एस.व्ही.नांदुरकर
वनपरिक्षेत्र अधिकारी, वाशिम.