रस्त्यावरील अतिक्रमण हटले; वाहतुकीसाठी रस्ता खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 04:38 PM2019-06-03T16:38:01+5:302019-06-03T16:38:42+5:30
वाशिम : हिंगोली नाका ते रेल्वे गेट या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळून जाणाºया रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : हिंगोली नाका ते रेल्वे गेट या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळून जाणाºया रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. स्थानिक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त रविवार, २ जून रोजी मंगरूळपीर, पूसदकडून येणारी वाहतूक याच मार्गाने बसस्थानक तसेच हिंगोलीकडे वळती केली होती.
हिंगोलीवरून येणारी वाहतूक एकेकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळून जाणाºया हिंगोली नाका ते रेल्वे गेट या रस्त्यावरून वळती केली जात होती. जुने शहरातील शेतकरी व नागरिकांनादेखील पुसद नाक्याचा फेरा न घालता जुना बाहेती ले-आउट जवळून गेलेल्या या रस्त्याने शेतात व रेल्वेगेटकडे जाणे सोयीचे होते. मध्यंतरीच्या काळात मात्र या रस्त्याचा काही भाग अतिक्रमणाने गिळंकृत केल्याने या रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. कालांतराने अतिक्रमण वाढत गेले आणि हिंगोली नाका ते रेल्वे गेटकडे कमी अंतर व वेळेत येणारा हा रस्ताच स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपडू लागला. दरम्यानच्या कालावधीत सदर प्रकरण न्यायप्रविष्ठदेखील झाले होते. मंजूर नकाशाप्रमाणे या रस्त्याचे काम करण्याचा निर्णय झाल्याने त्यानुसार रस्ता काम करण्यात आले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते, हे विशेष. रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. रेल्वेगेटजवळील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त २ जून रोजी मंगरूळपीर, पुसद, शेलुबाजार मार्गाकडून येणारी वाहतूक याच वळणमार्गाने बसस्थानक, हिंगोलीकडे वळती केली होती.